टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात आताही होऊ शकतो बदल, काय आहे आयसीसीचा नियम जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी जाणार आहे. पण संघाच्या घोषणेनंतर काही खेळाडूंचा फॉर्म एकदमच वाईट झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र अजूनही संघात बदल होऊ शकतो. कसा ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात आताही होऊ शकतो बदल, काय आहे आयसीसीचा नियम जाणून घ्या
| Updated on: May 07, 2024 | 8:40 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 1 जूनपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तसेच 29 जूनला अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. पहिलाच सामना कॅनडा आणि यजमान अमेरिका यांच्यात होणार आहे. तर 5 जूनला भारत आणि आयर्लंड सामना होईल. भारताच्या गटात पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा हे संघ आहेत. 1 मे ही संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख होती. तत्पूर्वी बीसीसीआयने 30 एप्रिलला संघाची घोषणा केली आहे. पण आता स्पर्धेला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना संघात बदल करणं शक्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आयसीसी नियमानुसार मोठ्या स्पर्धेच्या एक महिन्याआधी संघांची घोषणा करावी लागते. बहुतांश संघांनी आपल्या 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. आयसीसीला फक्त संघ हवा असतो, त्यानंतर तो घोषित करो या नको त्याच्याशी आयसीसीचा काही एक संबंध नसतो. भारताने संघाची घोषणा केल्यानंतरही पाकिस्तानने नावं जाहीर केली नव्हती. पण पाकिस्तानने 15 खेळाडूंची नाव आधीच पाठवली असू शकतात.

आयसीसीच्या नियमानुसार एकदा का संघ जाहीर झाला की त्यात काही बदल करायचा असल्यास 25 मेपर्यंतची तारीख दिली आहे. म्हणजेच स्पर्धा सुरु होण्याच्या पाच दिवस आधी हा बदल करता येईल. कारण खेळाडू वेगवेगळ्या लीग स्पर्धा, मालिका खेळत असतात. कधी कधी प्रॅक्टिस करताना दुखापतग्रस्त होऊ शकतात. हे सर्व लक्षात ठेवून हा नियम तयार केला गेला आहे. पण 25 मे नंतर संघात कोणताही बदल करता येत नाही.

बीसीसीआयने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच 4 खेळाडू राखीव ठेवले आहेत.जर 15 खेळाडूंपैकी एखादा जखमी झाला तर राखीव खेळाडूंना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. सध्या तरी बीसीसीआयने निवडलेल्या 15 खेळाडूंपैकी एकही खेळाडू दुखापतग्रस्त नाही. त्यामुळे संघात बदल होईल असं वाटत नाही. पण तसंच काही झालं तर ते 25 मेपर्यंत मुभा असेल. दुसरीकडे, आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी आहे. यात काही झालं तर मात्र कठीण होऊन बसेल. यामुळे काळजी घ्यावी लागेल.