
टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शिखर धवनने तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिस्टर आयसीसी म्हणून धवनला म्हटलं जायचं. कारण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बड्या खेळाडूंची भंबेरी उडालेली पाहायला मिळते. पण धवन त्यावेळी विरोधी संघावर एकटाच तुटून पडायचा. गेल्या दोन वर्षांपासून तो टीम इंडियामधून बाहेर होता. अखेर त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने धवनच्या निवृत्तीनंतर खास पोस्ट केली आहे.
रोहित शर्मा आणि शिखर धवन धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाकडून सलामीला येत होते. अनेक वर्षे दोघांनी ओपनिंग केली आणि टीम इंडियाला आक्रमक आणि मजबूत सलामी दिली. पण काही वर्षांनंतर धवनचं संघातील स्थान गेलं आणि रोहितसोबत ओपनिंगला येणारे खेळाडू बदलत राहिले. पण धवनसोबत खेळतानाच्या आठवणी रोहितच्या मनात कायमस्वरूपी राहिल्या. रोहितने आपल्या जीवाभावाच्या पार्टनरसोबतचे फोटो शेयर करत एक खास पोस्ट केली.
रूम्सपासून मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी शेअर करण्यापर्यंत. तू नेहमी माझे काम दुसऱ्या बाजूला राहून सोपे केलेस, असं रोहित शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच रोहितने दोघांचे सोबतचे काही फोटोही शेअर केलेत. दोघेही युवा खेळाडू म्हणून करियरची पायाभरणी करत होते. दोघांचा तो फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, टीम इंडियाची टॉप ऑर्डर किल्ल्याच्या तटबंदीसारखी होती. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे त्रिमुर्ती म्हणजे विरोधकांसाठी मोठा फास होता. कारण धवन आणि रोहितची भागीदारी झाली तर अर्धा सामना तेच जिंकवत होते. त्यानंतर कोहली येऊन विजयी पताका लावण्याचं काम करत होता.