Team India : रोहित-विराटनंतर आणखी एका दिग्गजाने साथ सोडली, कोण आहे तो?

India Tour Of England 2025 : इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियात अनेक उलथापालथ पाहायला मिळत आहे. आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर आणखी एका टीम इंडियाची साथ सोडली आहे.

Team India : रोहित-विराटनंतर आणखी एका दिग्गजाने साथ सोडली, कोण आहे तो?
Virat Kohli and Rohit Sharma
Image Credit source: Robert Cianflone/Getty Images
| Updated on: Jun 01, 2025 | 4:30 PM

टीम इंडियात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऑलराउंडर आर अश्विन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही इंग्लंड दौऱ्याआधी टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला आणि तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शुबमन गिल याला भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केलं. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आणखी एक दिग्गज टीम इंडियापासून वेगळा झाला आहे. या दिग्गजाच्या अशा निर्णयानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे.

टीम इंडियाचे स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग कोच सोहम देसाई टीम इंडियापासून वेगळा झाला आहे. सोहम देसाईने 2021 साली पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र सोहम देसाईने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर करियरसाठी दुसरा पर्याय निवडण्यासाठी टीम इंडियातील महत्त्वाचं पद सोडण्याचा निर्णय घेतला. देसाईने टीम इंडियाची साथ सोडण्याआधी काही वेळ रवी शास्त्री, त्यानंतर राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांच्यासह काम केलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.

मोहम्मद सिराज भावूक

सोहम देसाईच्या या निर्णयानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज फार भावूक झाला. सिराजने देसाईसाठी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केलीय. सोहम देसाई माझ्यासाठी एक कोच नाही तर मेंटॉर आणि मोठा भाऊ असल्याचं सांगितलं. सोहम देसाईचा त्याच्या कारकीर्दीवर किती इमपॅक्ट आहे, हे सिराजने सांगितलं. तसेच सिराजने सोहम देसाईच्या डेडीकेशनबाबतही सांगितलं.

सिराजने पोस्टमध्ये काय म्हटलं?

कुणा अशा व्यक्तीला अलविदा करणं सोपं नसतं, जो कोचपेक्षा खूपकाही आहे. जो एक मार्गदर्शक, एक मेंटॉर आणि एक भाऊ राहिलाय.हा शेवट नाही, मात्र नंतर भेटू. तुमचा इमपॅक्ट कायमच माझ्यासह असेल. माझ्यासाठी तुम्ही कधीही फक्त एक ट्रेनर नव्हता. तुम्ही एक अशी व्यक्ती होतात, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात आणि क्रिकेटर म्हणून नाही तर वैयक्तिक पातळीवरही माझी मदत केली. तुमचं कामाप्रती असलेलं समर्पण हे उल्लेखनीय होतं. तुम्ही आम्हाला दिवसेंदिवस शारिरीक आणि मानसिकरित्याही मजबूत केलं. तसेच शिस्तप्रिय होण्यासाठी प्रेरणा दिली, असं सिराजने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

मोहम्मद सिराजची पोस्ट व्हायरल

दरम्यान बीसीसीआयने आतापर्यंत सोहम देसाई यांच्या जागी दुसऱ्या कोचची नियुक्ती केलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात बीसीसीआयकडून नाव जाहीर केलं जाऊ शकतं. कारण टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात काही दिवसानंतर होत आहे.