“मी बीसीसीआय अध्यक्षांना विनंती केली आणि..”, सचिनच्या शेवटच्या सामन्याबाबत माहित नसलेला तो किस्सा
50th anniversary celebration of wankhede stadium : सचिन तेंडुलकर याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटचा सामना हा वानखेडे स्टेडियममध्ये खेळला होता. सचिनने या सामन्यामागचा माहित नसलेला किस्सा वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सांगितला.

टीम इंडियाचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात अनेक आठवणींना उजाळा दिला. एमसीएकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सचिनने त्याच्या वानखेडे स्टेडियममधील आठवणींचा पाढा वाचून दाखवला. सचिनने क्रिकेटचे धडे याच स्टेडियममध्ये गिरवले. तर याच स्टेडियममधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा सामना हा याच ऐतिहासिक स्टेडियममध्ये खेळला. सचिनला 200 व्या कसोटी आणि अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानिमित्ताने खास निरोप देण्यात आला. सचिनचा निरोप सामना हा अविस्मरणीय व्हावा, यासाठी बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमध्ये खास आयोजन केलं. मात्र सचिनला त्याचा शेवटचा सामना स्वत:साठी नाही तर आईसाठी खेळायचा होता. यामागची इनसाईड स्टोरी स्वत: सचिननेच सांगितलीय.
सचिन काय म्हणाला?
“माझ्या कारकीर्दीतील शेवटची कसोटी मालिका जाहीर होण्याआधी मी बीसीसीआय अध्यक्षांच्या संपर्कात होतो. माझा शेवटचा सामना हा एका कारणामुळे वानखेडे स्टेडियममध्ये व्हावा, ही इच्छा मी बीसीसीआय अध्यक्षांकडे बोलून दाखवली. मी टीम इंडियासाठी 24 आणि त्याआधी 6 अशी एकूण जवळपास 30 वर्ष खेळलो. मात्र माझ्या आईने मला 30 वर्ष कधी खेळताना पाहिलं नाही. तसेच त्यावेळेस माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे आईसाठी वानखेडे व्यतिरिक्त इतर दुसरं कोणतही स्टेडियम सोयीस्कर ठरलं नसतं.त्यामुळे आईने इथं यावं आणि मी 24 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी का जात आहे? हे तिने इथे बसून पाहावं. यासाठी मालिकेतील सामना मुंबईत खेळवावा अशी मी माझी शेवटची इच्छा बीसीसीआयकडे बोलून दाखवली आणि त्यांनी ती पूर्ण केली”, असं सचिनने या खास कार्यक्रमात म्हटलं.
सचिनने सांगितला तो किस्सा
#WATCH | Wankhede Stadium’s 50th anniversary: Maharahstra | Cricket legend Sachin Tendulkar says, “Before the series of my last match was announced – I got in touch with BCCI and made one request that I want my last match to be held in Mumbai for one very reason – I played… pic.twitter.com/gxTqlLN8xv
— ANI (@ANI) January 19, 2025
शरद पवारांनी सांगितल्या वानखेडे स्टेडियमच्या आठवणी
दरम्यान या कार्यक्रमाला आयसीसीचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी शप गटाचे प्रमुख शरद पवार हे देखील उपस्थित होते. पवारांनी वानखेडे स्टेडियमबाबत आठवणी सांगितल्या. तसेच या ऐतिहासिक स्टेडियमच्या निर्मितीचा किस्साही सांगितला.
शरद पवार काय म्हणाले?
“तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन या ऐतिहासिक सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहिलात. देशाच्या जनेतेने क्रिकेटचा नेहमी सन्मान केला. या खेळाचे दोन भाग आहेl, एक जे मैदान गाजवणारे आणि दोन मैदान तयार करणारे. आम्ही सगळे या ठिकाणी जे बसलो आहेत ते मैदान तयार करणारे आहेत. शेषराव वानखेडे साहेबांनी मला 52 वर्षांपूर्वी या ठिकाणी बोलवलं आणि ही जागा हवी असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना सांगून ही जागा क्रिकेटसाठी तयार करण्यात आली”, असा किस्सा शरद पवार यांनी या वेळेस सांगितला.