
भारतीय संघाने अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंडला प्रत्येक सामन्यात झुंजवलं आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंड संघ त्यातल्या त्यात सहज जिंकला. पण उर्वरित तीन सामन्यात भारतीय संघाने त्यांची हवा काढली. दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला, तिसरा कसोटी सामना अवघ्या 22 धावांनी गमावला, तर चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 311 धावांची आघाडी घेऊन दोन दिवस फलंदाजी करून सामना ड्रॉ केला. त्यामुळे भारतीय संघाने शुबमन गिलच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. शुबमन गिलही कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करत आहे. त्यामुळे टीम इंडियाचा योग्य समतोल दिसत आहे. पण असं सर्व असताना एक गोष्ट मात्र टीम इंडियाच्या विरुद्ध जाताना दिसत आहे. नाणेफेकीचा कौल काही टीम इंडियाच्या बाजूने लागत नाही. सलग पाच सामन्यात शुबमन गिलने नाणेफेकीचा कौल गमावला. त्यामुळे इंग्लंड जे देईल ते घ्यावं लागत आहे.
शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने बेन स्टोक्सच्या गैरहजेरीत ओली पोपच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. पण ओली पोपने नाणेफेकीत संघाला यश मिळवून दिलं. तसं पाहीलं तर हा कौल काही कोणाच्या हाती नसतो. पण त्यालाही नशिबाची साथ मिळाली असं म्हणावं लागेल. ओव्हल कसोटीसह भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 15व्यांदा नाणेफेक गमावली. भारतीय संघाचा नाणेफेक गमवण्याचा कित्ता 31 जानेवारी 2025 पासून सुरु आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील एका सामन्यापासून हे सुरु झालं होतं. तेव्हा सूर्यकुमार यादव कर्णधार होता. त्यानंतर वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माला नाणेफेकीचा साथ मिळाली नाही. आता पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुबमन गिलने सलग पाच नाणेफेकीचे कौल गमावले.
नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर शुबमन गिल म्हणाला की, ‘जोपर्यंत आपण सामना जिंकतो तोपर्यंत नाणेफेक हरायला हरकत नाही. काल काय करावे याबद्दल थोडा गोंधळलेला होतो. थोडासं ढगाळ होतं पण खेळपट्टी चांगली दिसतेय, पहिल्या डावात चांगले धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. गोलंदाजांसाठी चांगली खेळपट्टी असावी. आमच्या संघात तीन बदल आहेत. पंत, शार्दुल आणि बुमराह यांच्या जागी जुरेल, करुण आणि प्रसिद्ध यांचा समावेश आहे. आम्ही खेळत असलेल्या प्रत्येक सामन्यात विजयाची अपेक्षा करतो. आम्ही जवळ आलो आहोत आणि आता 5 ते 10 टक्के अतिरिक्त दम लागेल, खेळाडू त्यांचे सर्वस्व देतील.’