
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून यूएईत सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील सामने 20 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. आशिया कप स्पर्धेसाठी शुबमन गिल याचं टी 20i संघात पुनरागमन झालंय. तसेच शुबमनला उपकर्णधार पद देण्यात आलं आहे. मात्र त्याआधी भारताला मोठा झटका लागला आहे. शुबमन गिल याला दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेआधी देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या स्पर्धेला मुकावं लागू शकतं. देशांतर्गत क्रिकेट हंगामाला दुलीप ट्रॉफी स्पर्धेने सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी शुबमनबाबत आलेल्या अपडेटमुळे चाहत्यांसह टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे. शुबमनला नक्की काय झालंय? तो कशामुळे खेळू शकणार नाही? हे जाणून घेऊयात.
शुबमनकडे दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी नॉर्थ झोनच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्याआधी शुबमन आजारी असल्याचा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन आजारी आहे. शुबमन चंडीगढमध्ये आराम करत आहेत. त्यामुळे शुबमन दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होऊ शकणार की नाही? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. शुबमन आशिया कप स्पर्धेसाठी निवड झाल्याने संपूर्ण दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचं निश्चित होतं. मात्र आता आजारामुळे शुबमन दुलीप ट्रॉफीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तरी खेळू शकणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
क्रिकबझ रिपोर्ट्सनुसार, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आजारी आहे. त्यामुळे शुबमन 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सर्व सामने हे बंगळुरुतील सीओए अर्थात सेंट्रल ऑफ एक्सीलेंस मध्ये आयोजित करण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या फिजीओने शुबमनला दुलीप ट्रॉफीत न खेळण्याचा सल्ला दिला आहे. मात्र बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
शुबमन बाहेर झाल्यास दुलीप ट्रॉफी स्पर्धेत नॉर्थ झोनच्या नेतृत्वाची जबाबदारी कोण सांभाळणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या नॉर्थ झोनच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी ही अंकित कुमार याच्याकडे आहे. त्यामुळे शुबमन बाहेर झाल्यास अंकीतला कॅप्टन्सी मिळू शकते.