
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 अशा फरकाने गमावली. त्यानंतर आता उभयसंघातील 5 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप 2025-2027 या साखळी अंतर्गत होणार आहे. या मालिकेला 14 नोव्हेंबर सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. तर टीम इंडिया स्क्वॉड केव्हा जाहीर करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाची 5 नोव्हेंबरला घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. या खेळाडूला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून तो खेळाडू टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र आता त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड होणं निश्चित समजलं जात आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. आता फक्त भारतीय संघ जाहीर करणं बाकी आहे. ऋषभ पंत या मालिकेतून कमबॅक करणार असल्याचं निश्चित म्हटलं जात आहे.
ऋषभ पंत याला मायदेशात झालेल्या विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतीमुळे खेळता आलं नव्हतं. पंत त्या मालिकेचा भाग नव्हता. पंतला जुलै महिन्यात इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मात्र पंतने दुखापतीवर मात केल्यानंतर दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध कमबॅक केलं. पंतच्या नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात करत विजयी सुरुवात केली. तर दुसरा आणि अंतिम सामना हा 6 नोव्हेंबरपासून होणार आहे.
पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी एन जगदीशन याच्या जागी संधी देण्यात येणार आहे. जगदीशन याला विंडीज विरूद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली होती. तसेच पंत इंग्लंड विरूद्धच्या मालिकेतून बाहेर झाल्यानंतर जगदीशनचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता जगदीशनला डच्चू मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान जगदीशने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करत टीम इंडियात धडक दिली. मात्र जगदीशन याची गेल्या अनेक मालिकांपासून पदार्पणाची प्रतिक्षा कायम आहे.