
T-20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यावर टीम इंडिया मायदेशी परतल्यावर मुंबईमधील विक्ट्री परेड जगाने पाहिली. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांचा महासागर मरिन ड्राईव्हरवर आलेला. कोणालाही वाटलं नव्हतं इतक्या लाखोंच्या संख्येने गर्द होईल. कॅप्टन रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांनी टीम इंडियाला 11 वर्षांनी आयसीसीची ट्रॉफी मिळवून दिली होती. त्याआधी दोन फायनल आणि सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यामुळे टीम इडियाचं मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. लाखोंच्या गर्दीला मुंबई पोलिसांनी नियंत्रित केलं आणि विक्ट्री परेड यशस्वीपणे पार पाडली. यादरम्यान काही चाहत्यांना श्वास घेता आला नाही त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं होतं. सगळेजण आपल्या चॅम्पियन खेळाडूंचं स्वागत करत होते, त्यावेळी एक पोलीस हवालदार आपलं कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडत होता.
मोठ्या गर्दीमध्ये एका महिलेची प्रकृती खालावली. तिला श्वास घेता येत नव्हता आणि तिची प्रकृती बिघडली होती. काही वेळाने महिलेला जास्त त्रास झाला आणि चक्कर येऊ लागली. हे मुंबई पोलीस हवालदार सईद सलीम पिंजारी यांनी पाहिलं. त्यांनी वेळ न दवडत त्या महिलेला उचलून घेतलं आणि बाहेर श्वास घेता येईल अशा ठिकाणी नेलं. तिथे महिलेला शुद्धा आल्यावर पिंजारींनी पाणी आणि बिस्किट खायला दिलं. काही वेळाने त्या महिलेला रूग्णवाहिकेमध्ये बसवून रूग्णलयात पाठवण्यात आलं.
मुंबई पोलिसांनीही सईद सलीम पिंजारींचे कौतुक केले आहे. तर सोशल मीडियावरही पिंजारींनी बजावलेल्या कर्तव्यामुळे नेटकरी कौतुकाचा वर्षाव करतायेत. जर पिंजारी यांनी लक्ष दिलं नसतं तर काहीतरी अनुचित प्रकार घडला असता. हे सर्व आमच्या प्रशिक्षणामुळे मी करू शकलो. मुंबई पोलिसांचा एक भाग असल्याचा मला अभिमान असल्याचं सईद सलीम पिंजारी म्हणाले.
दरम्यान, लाखोच्या गर्दीमध्ये चाहत्यांनीही एका रूग्णवाहिकेला जागा करून दिली. मुंगीलाही जायला जिथे जागा नव्हती त्या ठिकाणून रूग्णवाहिकेला जागा दिल्याने मुंबईकरांनी माणुसकीचे दर्शन दिले. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव यांच्यासह इतर खेळाडूंनी पोलिसांच्या कामांचं कौतुक केलं