जसप्रीत बुमराहने केलेल्या त्या शब्दावर टेम्बा बावुमा अखेर व्यक्त झाला, म्हणाला…

IND vs SA: दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी, वनडे आणि टी20 मालिका संपली आहे. भारताने वनडे आणि टी20 मालिकेत विजय मिळवला. पण कसोटी व्हाईट वॉश मिळाल्याने नाचक्की झाली. त्यात जसप्रीत बुमराहने शब्दप्रयोग वादाचं कारण ठरलं. आता त्यावर टेम्बा बावुमाने आपलं मत मांडलं आहे.

जसप्रीत बुमराहने केलेल्या त्या शब्दावर टेम्बा बावुमा अखेर व्यक्त झाला, म्हणाला...
जसप्रीत बुमराहने केलेल्या त्या शब्दावर टेम्बा बावुमा अखेर व्यक्त झाला, म्हणाला...
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 24, 2025 | 6:57 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 2-0 ने पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीचं स्वप्न भंगणार असंच दिसत आहे. दोन्ही संघाकडून झालेल्या वादग्रस्त शब्दप्रयोगामुळे ही कसोटी मालिका चर्चेत राहिली. या मालिकेत जसप्रीत बुमराहने टेम्बा बावुमाबाबत उच्चारलेल्या शब्दावरून मोठा वाद झाला होता. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर पहिला कसोटी सामना खेळला गेला. तेव्हा जसप्रीत बुमराहने टेम्बा बावुमाविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. पण पंचांनी नकार दिला. तेव्हा डीआरएस घेण्यावरून बुमराहने बावुमाचा उल्लेख ठेंगणा असा केला होता. त्याचा म्हणणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं होतं. या प्रकरणी जसप्रीत बुमराहने माफी मागितली होती. आता जसप्रीत बुमराहच्या त्या शब्दप्रयोगावर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने मौन सोडलं आहे.

ईएसपीएन क्रिकइंफोच्या कॉलमध्ये त्याने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. यात त्याने लिहिलं की, मला माहिती आहे की माझ्यासोबत काय झालं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या भाषेत माझ्याबाबत काही बोलले होते. पण सामना संपल्यानंतर ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांनी माझी माफी मागितली. जेव्हा त्यांनी माझी माफी मागितली तेव्हा मला याबाबत काहीच माहिती नव्हतं. मी मग मिडिया मॅनेजरशी याबाबत चर्चा केली आणि मग मला कळलं. पण मला असं वाटतं की, मैदानातील गोष्टी मैदानातच राहाव्यात. पण तुम्ही काही गोष्टी विसरू शकत नाही. तुम्ही असं काही घडलं तर एक प्रेरणा म्हणून त्याचा वापर करू शकता.

आमच्या प्रशिक्षकाने योग्य शब्द वापरायला हवा होता

दक्षिण अफ्रिकन संघाचे प्रशिक्षक शुकरी कॉनराड यांनी गुवाहाटी कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाबाबत वादग्रस्त शब्दप्रयोग केला होता. त्यावरून बराच वाद रंगला होता. आता बावुमाने मुख्य प्रशिक्षकांच्या वक्तव्याबाबत आपल्या कॉलममध्ये उल्लेख केला आहे. त्यात त्याने लिहिलं की, जेव्हा मी पहिल्यांदा त्यांचं वक्तव्य ऐकलं तेव्हा चांगला वाटलं नाही. पण मला आठवण करून दिली की ही कसोटी मालिका किती कठीण होती. शुकरीने वनडे मालिके दरम्यानं या वक्तव्याबाबत चर्चा केली आणि मुद्दा तिथेच संपवून टाकला.