वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्सऐवजी होणार भारतात? अशा सुरु आहेत घडामोडी!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. 11 जूनपासून होणाऱ्या या सामन्याचं आयोजन इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानात करण्यात आलं आहे. पण पुढच्या पर्वासाठी बीसीसीआयने जोरदार फिल्डिंग लावली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्सऐवजी होणार भारतात? अशा सुरु आहेत घडामोडी!
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
Image Credit source: Paul Kane/Getty Images
| Updated on: May 10, 2025 | 5:54 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपचं तीन पर्व पार पडली आहे. तिसऱ्या पर्वाचा अंतिम सामना 11 जूनपासून लॉर्ड्स मैदानात होणार आहे. यापूर्वी इंग्लंडने 2021 आणि 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन केले होते. त्यानंचर चौथ्या पर्वासाठी कसोटी मालिका सुरु होणार आहे. या पर्वासाठी बीसीसीआयने फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना भारतात भरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचे आयोजन करण्यासाठी बोली सादर केली आहे. दरम्यान, बीसीसीआयने बोली सादर केल्यास इतर क्रिकेट बोर्डांकडून स्पर्धा होण्याची शक्यता नाही. शिवाय, उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून आयसीसीने क्रिकेटची क्रेझ असलेल्या देशात अंतिम सामना आयोजित केल्यास फायदाच आहे. त्यामुळे 2027 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतात होणार हे जवळजवळ निश्चित आहे.

भारतीय अंतिम फेरी गाठू न शकल्याने आयसीसीचा महसूल बुडाला!

2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारत पात्र ठरू शकला नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने भारताची संधी हुकली. तर दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त कामगिरी केल्याने अंतिम फेरीचं तिकीट मिळालं. पण यामुळे आयसीसीचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिकीट विक्री आणि प्रायोजकत्वातील तोट्यामुळे आयसीसीला सुमारे 4 दशलक्ष पौंडचा महसूल गमावावा लागू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, आयसीसी स्पष्ट आहे की जर 207 चा अंतिम सामना भारतात झाला तर जाहिराती आणि तिकीट विक्रीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. या कारणास्तव आयसीसी आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे यजमानपद बीसीसीआयकडे सोपवण्याची दाट शक्यता आहे.

2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कधी आहे?

2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यावेळी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे 11 जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी आमनेसामने येतील. हा सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स स्टेडियममध्ये होत आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर यापूर्वी 2021 आणि 2023 च्या स्पर्धेचा अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदा भारत-न्यूझीलंड आमि दुसऱ्यांदा भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. दोन्ही वेळेस भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.