
इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील 13वा सामना लंडन स्पिरिट आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लंडन स्पिरीटने 21 धावांनी विजय मिळवला. पण हा सामना एका घटनेमुळे चर्चेत राहिला. कारण या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम अल्सोपला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला अर्ध्यातच डाव सोडावा लागला. ट्रेंट रॉकेट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लंडन स्पिरीटने 100 चेंडूत 5 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. पण या धावा करताना ट्रेंट रॉकेट्स 141 धावांवर थांबला. हा सामना लंडन स्पिरीटने 21 धावांनी जिंकला. खरं ट्रेंट रॉकेट्ससाठी टॉम बॅन्टम आणि जो रूट यांनी चांगली सुरुवात केली. पण 73 धावांवर विकेट पडली आणि घसरगुंडी सुरु झाली. मधल्या फळीत मार्कस स्टोइनिसने 35 धावा केल्या. पण इतर कोणीही तग धरू शकलं नाही. ट्रेंट रॉकेट्स संघाने 90 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे टॉम अल्सोप मैदानात उतरला. दोन चेंडू खेळला आणि तिसऱ्या चेंडूवर रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतावं लागलं.
लंडन स्पिरिटचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनने एक बाउन्सर टाकला, जो थेट अल्सोपच्या नाकावर लागला. विशेष म्हणजे अल्सोपने हेल्मेट घातले होते. तरीही चेंडू हेल्मेटच्या जाळी भेदून आत गेला आणि त्याच्या नाकाला जोरात लागला. वेदनेने अल्सोप कळवळू लागला आणि मैदानावरच झोपला. यावेळी त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. वैद्यकीय टीमने तात्काळ मैदानात धाव घेत त्याला मैदानाबाहेर नेले. त्याला रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आलं. त्याची स्थिती पाहून मैदानात भयाण शांतता पसरली होती. पण सुदैवाने गंभीर असं काही नव्हतं. आता त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जेमी स्मिथने या सामन्यात सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कर्णधार केन विल्यमसनने 45 धावा आणि अॅश्टन टर्नरने 30 धावा केल्या. जेमी स्मिथ सामन्यानंतर आनंद व्यक्त सांगितलं की, ‘जिंकल्याचा खूप आनंद झाला. आम्ही खूप वेग घेतला. आम्ही विकेट घेत राहिलो. सुरुवात करणे सोपे नव्हते. काही धावा मिळवून आनंद झाला. विशेषतः नवीन संघासाठी.’