
नशिबाची साथ असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. अशीच प्रचिती अमेरिकेतील मॅरिलँडच्या केव्स वॅली गोल्फ क्लबमध्ये पाहायला मिळाली. अमेरिकेत एका ब्रिटीश गोल्फरला नशिबाची साथ मिळाली. एका माशीने त्याला नशिबाचं दार खोललं. कसं काय? वगैरे असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण हे खरं आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्यावर विश्वास बसेल. एका माशीमुळे गोल्फरने बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप जिंकली नाही तर 17 कोटीचं बक्षीस देखील मिळवलं. गोल्फर टॉमी फ्लीटवूडला नशिबाची जबरदस्त साथ मिळाली. त्याने या विजयाचं श्रेय सोशल मीडियावर तरी माशीला दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहिला तर तुम्हीही म्हणाल काय नशिब आहे. कारण टॉमीने जेव्हा शॉट होलाकडे मारला. तेव्हा चेंडू किंचितसा होलात जाता जाता राहिला. त्यामुळे संधी हुकली असं वाटलं. पण काही सेकंदात चमत्कार झाला.
गोल्फर टॉमी फ्लीटवूटच्या या शॉटची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ही स्पर्धा संपली असून या शॉटमुळे ऐतिहासिक ठरली आहे. अंतिम फेरीत ब्रिटिश गोल्फर टॉमी फ्लीटवुडने सात अंडरने सुरुवात केली आणि चेंडू होलच्या दिशेने मारला. शॉट इतका जबरदस्त होता की चेंडू होलाच्या अगदी कडेला थांबला. टॉमीला काही सेकंद हा सामना गमावला असंच वाटलं. पण काही सेकंदात नव्हत्याचं होतं झालं. चेंडू अडकला होता तिथे एक माशी उडत आली आणि त्यावर बसली. त्यानंतर माशी चेंडूवरून सरकत पुढे आली आणि चेंडू सरळ होलात गेला. त्यामुळे टॉमीचा आनंद गगनात मावेनासा झाला. पीडीएने 10 सेकंदाच्या नियमामुळे त्याला विजेता घोषित केलं.
सुरुवातीला असं कसं झालं यावर अनेकांचा विश्वास बसला नाही. पण जेव्हा कॅमेरा फुटेज बारकाईने पाहिलं तेव्हा चेंडूवर माशी बसल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दुसरीकडे, इतकी छोटी माशी चेंडू हलवू शकते का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. न्यूयॉर्क पोस्टने या व्हिडिओचं विश्लेषण करताना सांगितलं की, माशीचं वजन जवळपास 1 मिलीग्राम असते. त्या बॉलचं वजन अधिक असतं. अशा स्थितीत चेंडू हलवून होलात पडणं कठीण आहे. दुसरीकडे, न्यूयॉर्क सिटी कॉलेजचे प्रोफेसर मिचियो काकू यांच्या मते, फिजिक्समध्ये एक टिपिंग पॉइंट कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे मोठ्या वस्तूही हलक्या झटक्याने पडू शकतात.