IPL : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे 10 फलंदाज, अभिषेक शर्मा कितव्या स्थानी?
Fastest Fifty In Ipl : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात वेगवान अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये किती विदेशी आणि किती भारतीय खेळाडू आहेत? कोणता फलंदाज कोणत्या स्थानी आहे? जाणून घ्या.

चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज उर्विल पटेल याने रविवारी 10 मे रोजी धमाका केला. उर्विलने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 65 धावांची खेळी करुन चेन्नईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. उर्विलने या दरम्यान तडाखेदार बॅटिंग करत अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं. उर्विलने यासह यशस्वी जैस्वाल याच्या आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. या निमित्ताने आयपीएल स्पर्धेत वेगवान 50 धावा करणाऱ्या 10 फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.
अभिषेक शर्मा
सनरायजर्स हैदराबादचा ओपनर अभिषेक शर्मा याने 15 चेंडूत अर्धशतक झळकावलंय. अभिषेकने 19 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ही कामगिरी केली होती. अभिषेकने त्या सामन्यात 22 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह एकूण 59 धावा केल्या होत्या.
निकोलस पूरन
विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन याने लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना 15 बॉलमध्ये 2023 साली आरसीबी विरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. पूरनने तेव्हा 19 बॉलमध्ये 62 रन्स केल्या होत्या.
सुनील नारायण
केकेआरचा ऑलराउंडर सुनील नारायण याने आतापर्यंत बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान दिलंय. सुनीलने 2017 साली आरसीबी विरुद्ध 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. सुनीलने त्या सामन्यात 17 चेंडूत 54 धावा केल्या होत्या.
झॅक फ्रेझर मॅकगर्क
झॅक फ्रेझर मॅकगर्क आयपीएलमध्ये 15 आणि त्यापेक्षा कमी चेंडूत 2 वेळा अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज आहे. झॅकने 2024 साली दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व करताना सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध ही कामगिरी केली होती.
वैभव सूर्यवंशी
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी 15 आणि त्यापेक्षा कमी चेंडूत 3 वेळा अर्धशतक करणारा एकमेव फलंदाज आहे. वैभवने ही कामगिरी 19 व्या मोसमातच केली आहे. वैभवने चेन्नई, आरसीबी आणि हैदराबाद या 3 संघांविरुद्ध ही अर्धशतकी खेळी केलीय.
रोमारियो शेफर्ड
आरसीबीचा विस्फोटक ऑलराउंडर रोमारियो शेफर्ड याने 2025 मध्ये सीएसके विरुद्ध 14 चेंडूत 53 धावांची झंझावाती खेळी केली होती.
केएल राहुल
केएल राहुल याने 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. केएलने 2018 साली पंजाब किंग्संच प्रतिनिधित्व करत असताना दिल्ली डेअरडेविल्स टीमसाठी ही कामगिरी केली होती.
पॅट कमिन्स
पॅट कमिन्स याने 2022 साली केकेआरसाठी खेळताना मुंबई विरुद्ध 14 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. पॅटने तेव्हा 15 चेंडूत नाबाद 56 धावा करुन टीमला जिंकवलं होतं.
उर्विल पटेल
उर्विल पटेल याला रविवारी आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी होती. मात्र ती संधी 1 चेंडूने हुकली. उर्विलने अर्धशतकासाठी 13 चेंडूंचा सामना केला. मात्र तसं असलं तरी उर्विलने वेगवान अर्धशतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
यशस्वी जैस्वाल
यशस्वीने 2023 साली राजस्थानसाठी खेळताना केकेआर विरुद्ध 13 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. यशस्वीच्या नावावर गेल्या 3 हंगांमापासून वेगवान अर्धशतकाचा विक्रम होता. मात्र आता उर्विलने यशस्वीच्या विक्रमाची बरोबरी केली.