Asia Cup : आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील 7 यशस्वी गोलंदाज, टीम इंडियाचे किती?

Most Wickets In Asia Cup : आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 7 गोलंदाजांमध्ये एकाच संघाचे 4 जण आहेत. तर भारताच्या दोघांचा समावेश आहे.

Asia Cup : आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील 7 यशस्वी गोलंदाज, टीम इंडियाचे किती?
Team India Ravindra Jadeja Asia Cup
Image Credit source: ravindra jadeja x account
| Updated on: Aug 14, 2025 | 1:11 AM

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तर अंतिम सामना हा 28 सप्टेंबरला पार पडणार आहे. यंदा आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. याआधी 2 वेळा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच 14 वेळा या स्पर्धेतील सामने वनडे फॉर्मेटने झाले आहेत. यंदा या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये आशिया कप जिंकण्यासाठी चुरस असणार आहे. तसेच गतविजेत्या भारतीय संघासमोर आशिया कप कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. बीसीसीआय निवड समितीकडून ऑगस्ट महिन्यातील चौथ्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भारतीय संघात कुणाला संधी मिळते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

भारताचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदा या स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत शंका आहे. बुमराहला आगामी विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे बुमराहच्या अनुपस्थितीत इतर गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या निमित्ताने आशिया कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी 7 गोलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 7 पैकी सर्वाधिक 4 गोलंदाज हे श्रीलंकेचे आहेत. तसेच 2 भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. तर पाकिस्तानचा 1 बॉलर आहे. लसिथ मलिंगा हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

लसिथ मलिंगा

श्रीलंकेचा माजी गोलंदाज आणि यॉर्करचा बादशाह लसिथ मलिंगा याने आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स मिळवल्या आहेत. मलिंगाने 15 सामन्यांमध्ये 33 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच मलिंगाने 3 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

मुथैया मुरलीथरन

सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा माजी दिग्गज आणि महान फिरकीपटू मुथैया मुरलीथरन दुसऱ्या स्थानी आहे. मुरलीने 24 सामन्यांमध्ये 28.33 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मुरलीने 1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.

रवींद्र जडेजा

भारताचा अनुभवी आणि स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. जडेजाने 26 सामन्यांमध्ये 29 विकेट्स मिळवल्या आहेत.

अंजता मेंडीस

श्रीलंकेचा माजी फिरकीपटू या यादीत चौथ्या स्थानी आहे. मेंडीसने 8 सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मेंडीसने 2 वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.

सईद अजमल

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सइद अजमल याने 12 सामन्यांमध्ये 19.40 च्या सरासरीने एकूण 25 विकेट्स घेतल्या आहेत.

चामिंडा वास

श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास या यादीत सहाव्या स्थानी आहे. वासने 19 सामन्यांमध्ये 23 फलंदाजांना बाद केलं होतं.

इरफान पठाण

भारताचा माजी ऑलराउंडर या यादीत सातव्या स्थानी आहे. इरफानने 12 सामन्यांमध्ये एकूण 22 विकेट्स घेतल्या होत्या.