ट्रेव्हिस हेडचं वादळ! 75 चेंडूत शतकी धमाका करत 72 तासांत रचला नवा इतिहास
ट्रेविस हेडने जानेवारी 2026 मध्ये ॲशेस मालिकेतील एका सामन्यात शतक झळकावले होते. परंतु, त्यानंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या सर्व डावांमध्ये त्याला कोणतीही मोठी किंवा विशेष कामगिरी करता आली नव्हती.

गेल्या काही काळापासून फॉर्मसाठी झगडणाऱ्या ट्रेविस हेडच्या बॅटमधून अखेर त्याच्या लौकिकानुसार धावा निघाल्या आहेत. या वर्षात जवळपास 8 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, हेडने एक दमदार खेळी करून ऑस्ट्रेलियन संघाला मोठा दिलासा दिला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ट्रेविस हेडने अवघ्या 75 चेंडूंमध्ये शतक ठोकून इतिहास रचला आहे. तो झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 4 धावा करणाऱ्या ट्रेविस हेडने या सामन्यात सर्व कसर भरून काढली. या ऑस्ट्रेलियन स्टारने अवघ्या 32 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर काही क्षणांतच अवघ्या 75 चेंडूंमध्ये शतकही पूर्ण केले. अखेरीस हेड 84 चेंडूंमध्ये 112 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार मारले. ही झिम्बाब्वेविरुद्ध ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या देखील ठरली आहे.
72 तासांत मोडला मॅट रेनशॉचा विक्रम
ट्रेविस हेडच्या या वादळी शतकामुळे झिम्बाब्वेविरुद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडूने केलेल्या सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. हेडने या मालिकेतील पहिल्या सामन्यात अवघ्या 72 तासांपूर्वी सहकारी खेळाडू मॅट रेनशॉने प्रस्थापित केलेला विक्रम मोडला. रेनशॉने पहिल्या सामन्यात 86 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले होते, ज्याला हेडने 75 चेंडूत शतक ठोकत मागे टाकले.
हेडचे 20वे शतक आणि ऑस्ट्रेलियाचा ‘अजिंक्य’ रेकॉर्ड!
ट्रेविस हेडचे आठवे एकदिवसीय शतक आहे आणि ऑगस्ट 2025 नंतर प्रथमच त्याने या फॉरमॅटमध्ये 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, हे हेडचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 20 वे शतक आहे. जेव्हा जेव्हा हेडने शतक झळकावले आहे, तो सामना ऑस्ट्रेलियाने गमावलेला नाही. मागील 19 शतकांमध्ये ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावला नसल्याने, आता या 20 व्या शतकानंतरही हाच कमाल इतिहास पुन्हा रिपीट होणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
ऑस्ट्रेलियाचा 356 धावांचा डोंगर
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी केली. ट्रेविस हेडच्या शतकाच्या आणि इतर फलंदाजांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 6 गडी गमावून 356 धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे.