
अंडर 19 वूमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. टीम इंडियाने स्पर्धेतील 24 व्या सामन्यात श्रीलंकेवर 60 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने यासह साखळी फेरीत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजांसमोर श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 58 धावाच करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे सलग तिसरा विजय मिळवला. टीम इंडियाने याआधी मलेशिया आणि विंडीजवर मात केली होती.
भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच झटके द्यायला सुरुवात केली. या झटक्यातून श्रीलंकेला शेवटपर्यंत सावरता आलं नाही. श्रीलंकेच्या फक्त एकाच फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला. श्रीलंकेसाठी एका फलंदाजाने सर्वाधिक 15 धावा केल्या. एकाला भोपळाही फोडता आला नाही. दोघे नाबाद परतले. तर उर्वरित 8 जणींना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून शबनम शकील, जोशिता व्ही जे आणि पारुनिका सिसोदिया या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 118 धावा केल्या. टीम इंडियासाठी गोंगाडी त्रिशा हीने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर इतर तिघींनी 10 पेक्षा अधिक धावा करत टीम इंडियाला 110 धावांच्या पुढे पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. श्रीलंकेकडून तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर तिघींनी प्रत्येकी 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
टीम इंडियाचा सलग तिसरा विजय
3⃣ Matches
3⃣ Wins #TeamIndia march into Super Six of the #U19WorldCup 👏 👏Updates ▶️ https://t.co/CGNAPCsYgN#INDvSL pic.twitter.com/TGm2p0a4UR
— BCCI Women (@BCCIWomen) January 23, 2025
दरम्यान टीम इंडिया आता साखळी फेरीनंतर सुपर 6 मध्ये पोहचली आहे. टीम इंडिया सुपर 6 मध्ये 2 सामने खेळणार आहे. टीम इंडिया पहिल्या सामन्यात 26 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध भिडणार आहे. तर टीम इंडियाची महिला ब्रिगेड 28 जानेवारीला स्कॉटलँडविरुद्ध भिडणार आहे.
अंडर 19 वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : निकी प्रसाद (कर्णधार), जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगाडी त्रिशा, सानिका चाळके, मिथिला विनोद, भाविका अहिरे, आयुषी शुक्ला, जोशिता व्ही जे, पारुनिका सिसोदिया, शबनम एमडी शकील आणि वैष्णवी शर्मा.
श्रीलंका अंडर 19 वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : मनुदी नानायककारा (कर्णधार), संजना कविंदी, सुमुदु निसानसाला (विकेटकीपर), दहामी सनेथमा, हिरुनी हंसिका, रश्मिका सेववंडी, शशिनी गिम्हनी, लिमांसा थिलकराथना, प्रमुदी मेथसारा, आसेनी थलागुने आणि चामोदी प्रबोदा.