
आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने वनडे आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक असा विजय साकारला आहे. टीम इंडियाने यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीचा तब्बल 234 धावांनी धुव्वा उडवला आहे. वैभव सूर्यंवशी याने केलेल्या 171 धावांच्या जोरावर टीम इंडियाने यूएईसमोर 434 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर यूएईला 200 धावांपर्यंतही पोहचता आलं नाही. मात्र यूएईने पूर्ण 50 ओव्हर खेळून काढल्या. यूएईने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. भारतासाठी 171 धावा करणारा वैभव सूर्यवंशी मॅन ऑफ द मॅच ठरला.
यूएईची विजयी धावांचा पाठलाग करताना 6 आऊट 53 अशी स्थिती झाली होती. मात्र पृथ्वी मधू, उद्दीश सुरी आणि सालेह अमीन या त्रिकुटाने या तिघांनी संघर्ष केला. या तिघांना यूएईला जिंकून देणं जमलं नाही. मात्र या तिघांनी तीव्र प्रतिकार केला. यूएईसाठी पृथ्वीने 87 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. तर उद्दीश आणि सालेह या जोडीने सामना संपेपर्यंत आठव्या विकेटसाठी 74 बॉलमध्ये 61 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली.
उद्दीशने 78 आणि सालेह याने 20 धावा केल्या. टीम इंडियासाठी दीपेश देवेंद्रन याने 2 विकेट्स घेतल्या.तर किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, खिलान पटेल आणि विहान मल्होत्रा या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी यूएईने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी बोलावलं. कर्णधार आयुष म्हात्रे याच्या रुपात भारताने 8 धावांवर पहिली विकेट गमावली. आयुषने 4 धावा केल्या. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 146 बॉलमध्ये 212 धावांची द्विशतकी भागीदारी केली. एरॉन आऊट झाल्याने ही जोडी फुटली. एरॉनने 69 धावा केल्या. या भागीदारीमुळे भारताला 400 पार पोहचता आलं.
वैभवने जोरदार फटकेबाजी करत 150 मजल मारली. त्यामुळे वैभवला द्विशतकाची संधी होती. मात्र त्याआधी वैभव आऊट झाला. वैभवने 95 बॉलमध्ये 14 सिक्स आणि 9 फोरसह 171 रन्स केल्या. वैभव आणि एरॉन व्यतिरिक्त विहान मल्होत्रा याने 69 धावा केल्या. तर वेदांत त्रिवेदी याने 38 धावांचं योगदान दिलं. अभिज्ञान कुंदु 32 आणि कंशिक चौहान याने 28 धावा जोडल्या. यूएईसाठी युग शर्मा आणि उद्दीश सुरी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.