U19 WC: सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानने फक्त 103 चेंडूत सामना संपवला, मिन्हासने वैभव सूर्यवंशीला मागे टाकलं

Pakistan U19 vs New Zealand U19: सुपर सिक्स फेरीत पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना पाकिस्तानने सहज जिंकला. तसेच उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवल्या आहे. या विजयाचे शिल्पकार ठरले ते समीर मिन्हास आणि अब्दुल सुभान...

U19 WC: सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानने फक्त 103 चेंडूत सामना संपवला, मिन्हासने वैभव सूर्यवंशीला मागे टाकलं
सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानने फक्त 103 चेंडूत सामना संपवला, मिन्हासने वैभव सूर्यवंशीला मागे टाकलं
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jan 27, 2026 | 6:22 PM

आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. सुपर सिक्स फेरीचे सामने सुरू असून उपांत्य फेरीसाठी चुरस सुरू आहे. सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला डोकंच वर काढू दिलं नाही. पाकिस्तानला न्यूझीलंडला 8 गडी राखून पराभूत केलं. विशेष म्हणजे हा सामना फक्त 103 चेंडूत जिंकला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 28.3 षटकात 110 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने 2 विकेट गमावल्या आणि 17.1 षटकात लक्ष्य गाठलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो समीर मिन्हास.. त्याने 59 चेंडूत नाबाद 76 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज अली रजा याने 3 विकेट, तर अब्दुल सुभान याने 4 विकेट घेतल्या.

समीर मिन्हासची विजयी खेळी

खरं तर हरारेची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक नव्हती. त्यामुळेच पहिल्या डावात न्यूझीलंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला. पण असूनही पाकिस्तानच्या समीर मिन्हासने अर्धशतक ठोकलं. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 128.81 चा होता. समीर मिन्हास व्यतिरिक्त या सामन्यात 14 खेळाडूंनी फलंदाजी केली. पण एकालाही 40 धावांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे समीर मिन्हासच्या फलंदाजीचं कौतुक होत आहे. दुसरीकडे, मंगळवारचा दिवस मिन्हासच्या नावावर राहिला. वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्ध 52 धावांची खेळी केली. त्याच्या तुलनेत मिन्हास धावांच्या बाबतीत पुढे राहिला.

न्यूझीलंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला

न्यूझीलंडला खेळपट्टीचा अंदाज होता. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला सावध फलंदाजी केली. 59 धावांपर्यंत एकही विकेट दिली नाही. मात्र त्यानंतर रांग लागली. पुढच्या 9 धावांमध्ये 6 विकेट तंबूत परतले होते. तसेच 110 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. अब्दुल सुभानने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या विजयासह पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पण अवघ्या काही तासात यात बदल होणार हे निश्चित आहे. कारण भारताने झिम्बाब्वेला पराभूत करतात गुणतालिकेतील समीकरण बदलेल.