
वैभव सूर्यवंशी याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात स्फोटक शतकी खेळी करुन आपला ठसा उमटवला. वैभवने हाच तडाखा इंग्लंड दौऱ्यातही कायम ठेवला आहे. अंडर 19 टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. अंडर 19 इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात 5 मॅचची यूथ वनडे सीरिज खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यात टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात धमाकेदार सुरुवात करत विजयी सलामी दिली. वैभवने या सामन्यात भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. वैभव दुसर्या सामन्यातही अशीच कामगिरी करण्यात यशस्वी ठरला.
वैभवने काउंटी ग्राउंड, नॉर्थम्पटन येथे तडाखेदार खेळी केली आणि भारताला झकास सुरुवात करुन दिली. कर्णधार आयुष म्हात्रे पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यानंतर वैभवने विहान मल्होत्रा याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 67 रन्सची पार्टनरशीप केली. एकट्या वैभवने 67 पैकी 45 धावा केल्या. दुर्दवाने वैभवचं अर्धशतक हुकण्याची सलग दुसरी वेळ ठरली. मात्र वैभवच्या या खेळीमुळे भारताचा डाव सावरला.
वैभवने 34 चेंडूत 132.35 च्या स्ट्राईक रेटने 45 धावा केल्या. वैभवने 45 पैकी 38 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. वैभवने 3 षटकार (18 धावा) आणि 5 चौकार (20 धावा) लगावले.
वैभवने पहिल्या सामन्यात 178 धावांचा पाठलाग करताना 40 पेक्षा अधिक धावा करत भारताच्या विजयात सर्वाधिक योगदान दिलं. वैभव भारताच्या विजयाचा हिरो ठरला. वैभवने सलामीच्या सामन्यात 19 चेंडूत 252.63 च्या स्ट्राईक रेटने 48 धावांची वादळी खेळी केली होती. वैभवने त्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकार लगावले होते.
वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी, पाहा व्हीडिओ
WELL PLAYED VAIBHAV SURYAVANSHI..!! 👏
– Scored 45 runs off 34 balls.
– With 5 fours and 3 sixes. pic.twitter.com/NfJ9GaxRdz— Sports Culture (@SportsCulture24) June 30, 2025
दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडसमोर दुसऱ्या सामन्यात 291 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49 षटकांमध्ये सर्वबाद 290 धावा केल्या. वैभव व्यतिरिक्त टीम इंडियाकडून विहान मल्होत्रा 49, राहुल कुमार 47 आणि कनिष्क चौहान याने 45 धावा केल्या. अभिज्ञान कुंदुने 32 धावांचं योगदान दिलं. तर मौल्यराजसिंह याने 22 रन्स केल्या. तर इतरांना काही खास करता आलं नाही. तर इंग्लंडकडून एएम फ्रेंच याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. जॅक होम आणि एलेक्स ग्रीन या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवत भारताला पूर्ण 50 ओव्हर खेळण्यापासून रोखलं.