वैभव सूर्यवंशीने पंतप्रधानांची घेतली भेट, इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोदींनी दिलं प्रोत्साहन

वैभव सूर्यवंशी मूर्ती लहान पण किर्ती महान असं व्यक्तिमत्व झालं आहे. वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये आपल्या खेळीचा ट्रेलर दाखवला. आता इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी वैभव सूर्यवंशीचं मनोबल वाढवलं.

वैभव सूर्यवंशीने पंतप्रधानांची घेतली भेट, इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोदींनी दिलं प्रोत्साहन
वैभव सूर्यवंशी आणि पंतप्रधान मोदी
Image Credit source: X
| Updated on: May 30, 2025 | 6:21 PM

वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटमधील चर्चित चेहरा आहे. 14 वर्षीय वैभवने त्याच्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकलं. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचे अनेक चाहते झाले आहेत. असं असताना वैभव सूर्यवंशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पटना विमानतळावर भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक्स हँडलवर याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या आई वडिलांशी चर्चा केली. वैभवची निवड अंडर 19 भारतीय संघात झाली आहे. या निवडीनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा झाल्याने वैभव सूर्यवंशीचं मनोबल वाढलं आहे. अंडर 19 संघाचा इंग्लंड दौरा 24 जूनपासून सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंड दौरा आणि येणाऱ्या इतर स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी वैभव सूर्यवंशीला शुभेच्छा दिल्या. वैभवसोबत माझ्या शुभेच्छा असतील असं त्यांनी सांगितलं.

‘पटणा विमानतळावर तरूण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबियांची भेट झाली. त्याची क्रिकेटमधील खेळीचं संपूर्ण देशात कौतुक होत आहे.भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी माझ्या शुभेच्छा त्याच्या सोबत आहेत.’ , अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच त्याच्यासोबत काढलेले फोटोही शेअर केले आहेत. वैभव सूर्यवंशी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळला. यावेळी त्याने आपल्या फलंदाजीने क्रीडाप्रेमींवर छाप पाडली. त्याने आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक ठोकलं.

वैभव सूर्यवंशीने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडला आणि आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींनी वैभवच्या कुटुंबियांसोबत दहा मिनिटं चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर होते. यावेळी परताना मोदी आणि वैभवची पटणा विमानतळावर भेट झाली. जेद्दाह आयपीएल मेगा लिलावात वैभवसाठी मोठी बोली लागली. 30 लाखांची बेस प्राईस असताना 13 वर्षांच्या खेळाडूला राजस्थान रॉयल्सने 1.1 कोटी रुपयांना खरेदी केले. 27 मार्च 2011 रोजी बिहारमध्ये जन्मलेला वैभव हा लिलावात भाव खालेल्ला सर्वात तरुण खेळाडू ठरला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us