
आशिया कप 2025 स्पर्धेला आज 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत 28 सप्टेंबरपर्यंत थरार अनुभवता येणार आहे. यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी आहेत. भारताकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा माना होता. मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यूएईत या स्पर्धेतील सर्व सामने होणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात स्पर्धेतील सलामीचा सामना होणार आहे. या दोघांव्यतिरिक्त बी ग्रुपमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट टीमचा समावेश आहे. तर ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान यूएई आणि ओमानचा समावेश करण्यात आला आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेत काही गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या आहेत. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी फक्त 6 संघात ही स्पर्धा व्हायची. मात्र आता संघांची संख्या 2 ने वाढून 8 अशी झाली आहे. तसेच ओमानचं आशिया कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या स्पर्धेत अनेक वर्षांनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी नाहीय. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धेतील सामने टी 20i फॉर्मेटने होणार आहेत. तर विराट आणि रोहितने टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना यंदा रोहित आणि विराटची उणीव भासणार आहे.
या स्पर्धेत 5 खेळाडूंची खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपला ठसा उमटवला आहे. या खेळाडूंमध्ये एकट्याच्या जोरावर सामना फिरवण्याची क्षमता आहे. आता हे खेळाडू आशिया कप स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या 5 खेळाडूंमध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. या निमित्ताने या 5 खेळाडूंबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने गेल्या वर्षभरात सातत्याने चमकदार कामगिरी केली. वरुणने 2021 साली टी 20i पदार्पण केलं. वरुणला काही सामन्यानंतर वगळण्यात आलं. त्यानंतर वरुणला कमबॅकसाठी काही वर्ष प्रतिक्षा करावी लागली. मात्र वरुणने त्यानंतर उल्लेखनीय कामगिरी केली. वरुणने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतही भारताला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली. वरुणने आतापर्यंत 18 टी 20i सामन्यांमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत. वरुणच्या गोलंदाजीत वैविध्य आहे. त्यामुळे वरुणची कामगिरी या स्पर्धेत भारतासाठी निर्णायक ठरु शकते.
अफगाणिस्तान क्रिकेट टीमने गेल्या काही वर्षभरात चमकदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानच्या टीममध्ये राशीद खान, मोहम्मद नबी यासारखे एकसेएक फिरकीपटू आहेत. यात अल्लाह गजनफर याचं नाव जोडलं गेलं आहे. गजनफर अवघ्या 18 वर्षांचा आहे. गजनफरला मोजक्याच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. मात्र गजनफर याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केलीय. गजनफर याने 44 टी 20 सामन्यांमध्ये 55 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानला गजनफर याच्याकडून आशिया कप स्पर्धेत जोरदार कामगिरीची आशा असणार आहे.
बांगलादेशचा रिशाद हुसैन गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खेळत आहे. रिशादने बांगलादेशासाठी 42 टी 20 सामन्यांध्ये 48 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच रिशाद बॅटिंगही करतो. त्यामुळे रिशाद बांगलादेशसाठी ऑलराउंडरची भूमिका बजावू शकतो.
श्रीलंकेचा युवा फंलदाज कामिल मिशारा याच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. कामिलने झिंबाब्वे विरुद्ध झालेल्या टी 20i मालिकेत 73 धावांची स्फोटक खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. श्रीलंकेला कामिलकडून आशिया कप स्पर्धेतही अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे.
पाकिस्तानचा युवा फलंदाज सॅम अयुब याने गेल्या काही वर्षांत चमकदार कामगिरी केलीय. सॅमने आतापर्यंत 41 टी 20i सामन्यांमध्ये 136 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तसेच सॅम पार्ट टाईम बॉलर आहे. त्यामुळे सॅम कितपत या स्पर्धेत आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरतो? हे काही सामन्यानंतर स्पष्ट होईल.