
आशिया कप- 2022च्या पहिल्या सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. जगाच्या नजरा या सामन्यावर होत्या. यात भारतानं पाच विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीकडे लागल्या होत्या कारण तो ब्रेकनंतर पुनरागमन करत होता. कोहलीला अर्धशतक झळकावता आले नाही पण त्याची खेळी उपयुक्त ठरली.पाकिस्तानविरुद्ध टी-20 मध्ये पाठलाग करताना कोहलीचे आकडे उत्कृष्ट राहिले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना गेल्या पाचपैकी तीन सामन्यात तो सामनावीर ठरला आहे.

कोहलीनं रविवारी आशिया कप-2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 34 चेंडूत 35 धावा केल्या. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला 148 धावांचे लक्ष्य दिलं होतं. या सामन्यात कोहली सामनावीर ठरला नाही. पण, त्याचा डाव महत्त्वाच्या वेळी आला जेव्हा भारतानं पहिल्याच षटकात केएल राहुलच्या रूपानं पहिली विकेट गमावली.

यापूर्वी मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता. हा सामना 19 मार्च 2016 रोजी खेळला गेला आणि या सामन्यात कोहलीनं नाबाद 55 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात कोहली सामनावीर ठरला.

2016च्या आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला होता. या सामन्यात भारतानं लक्ष्याचा पाठलाग केला आणि कोहलीनं 51 चेंडूत 49 धावा केल्या. या सामन्यातही कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

2014 मध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातही भारतानं धावांचा पाठलाग केला आणि सात गडी राखून विजय मिळवला. कोहली 36 धावांवर नाबाद राहिला आणि संघाला विजयापर्यंत नेण्यात यशस्वी ठरला, पण तो सामनावीर ठरला नाही.

2012 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ कोलंबोमध्ये आमनेसामने आले होते. या सामन्यातही भारताच्या वाट्याला विजय मिळाला. कोहलीने या सामन्यात 78 धावांची नाबाद खेळी खेळली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.