WCL 2025 : पाकिस्तान विरुद्धचा सामना रद्द, टीम इंडियासमोर आता कोणत्या संघाचं आव्हान?

World Championship of Legends 2025 : भारतीय खेळाडूंकडून पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्यात आला. त्यानंतर आयोजकांकडून हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे आता चाहत्यांना भारताच्या पुढील सामन्यासाठी आणखी काही तास प्रतिक्षा करावी लागणार आहे.

WCL 2025 : पाकिस्तान विरुद्धचा सामना रद्द, टीम इंडियासमोर आता कोणत्या संघाचं आव्हान?
Wcl India Champions
Image Credit source: X/INDIA CHAMPIONS
| Updated on: Jul 20, 2025 | 4:54 PM

वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात (WCL 2025) इंडिया चॅम्पियन्स संघाचा पहिलाच सामना रद्द करण्यात आला आहे. भारत या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार होती. मात्र वाढत्या विरोधानंतर अनेक भारतीय खेळाडूंनी या सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे परिणामी सामनाही रद्द करण्यात आला आहे. आता भारताचा या स्पर्धेतील पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत माजी ऑलराउंडर युवराज सिंह याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेला एबी डी व्हीलियर्स याच्याकडे दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाचं कर्णधारपद आहे.

भारताचा पुढील सामना केव्हा?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू आमनेसामने येणार होते. त्याआधी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यावरुन सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आधी काही खेळाडूंनी या सामन्यावर बहिष्कार घातला. तर त्यानंतर सामना रद्द करण्यात आला. आता भारतीय संघ 22 जुलैला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरुवात होईल. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे लाईव्ह मॅच पाहता येईल. हा सामना नॉर्थम्पटनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना टाय, असा ठरला विजेता

दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन्स यांच्यात शनिवारी 19 जुलैला सामना खेळवण्यात आला. हा सामना बरोबरीत राहिला. बरोबरीत राहिलेल्या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरद्वारे काढला जातो. मात्र या सामन्यात सुपर ओव्हरऐवजी बॉल आऊटद्वारे विजेता संघ निश्चित झाला. दक्षिण आफ्रिकेने बॉल आऊटद्वारे हा सामना 2-0 अशा फरकाने जिंकला.

दरम्यान इंडिया चॅम्पियन्स टीमने पहिल्या हंगामातच धमाका केला होता. इंडिया चॅम्पियन्सने वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे आता गतविजेता या दुसर्‍या हंगामात पहिला सामना रद्द झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी देते का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंडिया चॅम्पियन्स टीम : शिखर धवन, सुरेश रैना, अंबाती रायुडू, गुरकीरत सिंह मान, युवराज सिंह (कर्णधार), यूसुफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, रॉबिन उथप्पा, हरभजन सिंह, पीयूष चावला, विनय कुमार, सिद्दार्थ कौल, अभिमन्यु मिथुन आणि वरुण आरोन.