IND vs BAN : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत बांग्लादेश सामना रद्द होणार? झालं असं की…
चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण हा सामना होईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली असून दुसरा सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. हा सामना 20 फेब्रुवारीला होणार असून भारतीय संघ पहिल्या विजयासाठी आतुर आहे. भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. कारण त्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांचं आव्हान असणार आहे. तसेच उपांत्य फेरी गाठायची तर तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवणं खूपच गरजेचं आहे. पण भारतीय चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. दुबईत मंगळवारी सकाळपासून पाऊस पडत आहे. तसा दुबईत पावसाळा नाही, पण अचानक सुरु झालेल्या पावसामुळे भारत-बांग्लादेश सामन्यावर संकटात आला आहे. जर पाऊस थांबला नाही तर रद्द करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही.
अक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात 35 टक्के पावसाची शक्यता आहे. यामुळे सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. दुबईत तापमान सुमारे 24 अंश सेल्सियस आणि आर्द्रता 48 टक्के आहे आणि वाऱ्याचा वेग 11 किमी/तास आहे. अशा परिस्थितीत, जर सामन्यादरम्यान ढगाळ हवामानामुळे पाऊस पडला तर सामना अपरिहार्य कारणामुळे रद्द होऊ शकतो. पण पावसाने थोडी हजेरी लावली आणि गेला तर मात्र गोलंदाजांना मदत होऊ शकते. दोन्ही संघ नवीन चेंडूने प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणू शकतात. भारत या सामन्यात पाच गोलंदाजांसह उतरू शकतो. यात तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते.
साखळी फेरीत सामना रद्द करण्याची वेळ आली तर यासाठी राखीव दिवस नाही. त्यामुळे दोन्ही संघांना निकाल देण्यासाठी किमान 20 षटकं खेळणं गरजेचं आहे. पण सामना झालाच नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. पण सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरमध्ये विजेता ठरवला जाईल. त्यामुळे आता गुरुवारी दुबईतलं वातावरण कसं राहील याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाला तर भारताला उर्वरित दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. अन्यथा भारताचं स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येऊ शकतं.