ENG vs IND : स्मृतीनंतर चरणीची कमाल, टीम इंडियाची जबरदस्त सुरुवात, इंग्लंडचा 97 धावांनी धुव्वा

England Women vs India Women 1st T20I Match Result : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यात विजयी सलामी दिली आहे. भारताने इंग्लंड विरूद्धचा पहिल्या टी 20i सामना हा 97 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आहे.

ENG vs IND : स्मृतीनंतर चरणीची कमाल, टीम इंडियाची जबरदस्त सुरुवात, इंग्लंडचा 97 धावांनी धुव्वा
Womens Team India Smiriti Mandhana
Image Credit source: BCCIWomen X Account
| Updated on: Jun 28, 2025 | 10:44 PM

अंडर19 मेन्स नंतर आता सिनिअर वूमन्स टीम इंडियाने सांगलीकर स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलं आहे. वूमन्स टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20I सामन्यात धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने यजमान संघावर 97 धावांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  स्मृती मंधाना आणि श्री चरणी या दोघींनी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

ओपनर स्मृती मंधाना हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्री चरणी हीने घेतलेल्या सर्वाधिक 4 विकेट्समुळे इंग्लंडला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. श्री आणि इतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडला 14.5 ओव्हरमध्ये 113 रन्सवर गुंडाळलं आणि पहिला विजय नोंदवला.

इंग्लंडसाठी कॅप्टन नॅट सायव्हर ब्रँट हीने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला कसंतरी 100 पार पोहचता आलं. ब्रँटने 42 बॉलमध्ये 10 फोरसह 66 रन्स केल्या. तर या व्यतिरिक्त इतर सर्व इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. इंग्लंडसाठी कॅप्टन व्यतिरिक्त दोघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. मात्र त्यांना 15 धावांच्या आतच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर इतरांनी भारतीय गोलंदाजांसमोर सरेंडर केलं. श्री चरणी हीने 3.5 ओव्हरमध्ये अवघ्या 12 रन्स देत 4 विकेट्स मिळवल्या. दीप्ती शर्मा हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अमनज्योत कौर आणि अरुंधती रेड्डी या जोडीने 1-1 विकेट मिळवली.

कर्णधार स्मृती मंधानाचं शतकी धमाका

त्याआधी स्मृती मंधाना हीने केलेल्या विस्फोटक शतकाच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 210 रन्स केल्या. स्मृतीने 180.65 च्या स्ट्राईक रेटने 112 रन्स केल्या. स्मृतीने त्यापैकी फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 18 चेंडूत 78 धावा केल्या. स्मृतीने या खेळीत 3 गगनचुंबी षटकार आणि 15 चौकार ठोकले.

भारताचा दणदणीत विजय

स्मृती व्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या हर्लीन देओल हीने 43 धावांची स्फोटक खेळी केली. ओपनर शफाली वर्माने 20 तर रिचा घोष हीने 12 धावा जोडल्या. तर अमनज्योत कौर 3 तर दीप्ती शर्मा 7 धावा करुन नाबाद परतल्या.

दुसरा सामना केव्हा?

दरम्यान आता उभयसंघातील दुसरा सामना हा मंगळवारी 1 जुलै रोजी काउंटी ग्राउंड ब्रिस्टोल येथे होणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून सलग दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर इंग्लंडसमोर कमबॅक करण्यासह मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे.