
कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 दरम्यान एक मोठी बातमी समोर आलीय. वेस्टइंडीजचा दिग्गज क्रिकेटर ड्वेन ब्रावोने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. दुखापतीमुळे कॅरेबियन प्रीमियर लीगचा चालू सीजन संपण्याआधीच निवृत्ती घ्यावी लागली. लीग संपल्यानंतर सीपीएलमधून निवृत्ती घेणार असं आधी ड्वेन ब्रावोने जाहीर केलं होतं. सीपीएलमध्ये ब्रावो ट्रिनबागो नाइट रायडर्स टीमकडून खेळत होता. त्याला सेंट लुसिया किंग्स विरुद्धच्या सामन्यात फील्डिंग करताना कमरेला दुखापत झाली. त्यामुळे त्याला निवृत्तीचा मोठा निर्णय घ्यावा लागला.
ब्रावो सीपीएल इतिहासतील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. तो पाचवेळा विजेत्या टीमचा भाग होता. टी20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक विकेटही त्याच्या नावावर आहेत. पण आता 21 वर्षाची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली आहे. त्याला यूएईच्या आयएलटी 20 च्या तिसऱ्या सीजनमध्ये खेळायचं होतं. त्याला एमआय एमिरेट्सने रिटेन केलं होतं. पण सीपीएलमधील दुखापतीमुळे त्याला निवृत्ती जाहीर करावी लागली. पुढच्या महिन्यात वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ब्रावोने 2021 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मागच्यावर्षी आयपीएलमध्ये तो कोचच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर कोचिंगच्या दिशेने पावलं टाकत त्याने अफगानिस्तान टीमसोबत काम केलं.
निवृत्तीच्या पोस्टमध्ये काय म्हटलय?
ड्वेन ब्रावोने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत प्रोफेशनल क्रिकेटचा निरोप घेतला. “आज तो दिवस आहे, मी त्या खेळाचा निरोप घेतोय, ज्याने मला सर्वकाही दिलं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये 21 वर्षांचा हा प्रवास अविश्सनीय होता. यात अनेक चढ-उतार आले. मला पुढे जायचय पण शरीर साथ देत नाहीय. मला कोणाला निराश करायच नाहीय. म्हणून जड अंतकरणाने मी अधिकृतरित्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो” असं ड्वेन ब्रावोने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलय.
रेकॉर्ड-करियर काय?
ड्वेन ब्रावो आपल्या टी20 करियरमध्ये एकूण 582 सामने खेळला. या दरम्यान ड्वेन ब्रावोने 631 विकेट घेतलेत. ड्वेन ब्रावोने टी20 क्रिकेटमध्ये 11 वेळा 4 विकेट आणि 2 वेळा 5 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. त्याशिवाय टी20 करियरमध्ये एकूण 6970 धावा सुद्धा केल्या. यात 20 हाफ सेंच्युरी आहेत.