
आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाने जोरदार तयारी सुरु केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा झाली असून संजू सॅमसनचा समावेश झाला आहे. पण शुबमन गिलच्या एन्ट्रीमुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल की नाही अशी शंका आहे. दुसरीकडे, संजू सॅमसन केरळ क्रिकेट लीग स्पर्धेदरम्यान चर्चेत आला आहे. कोच्चि ब्लू टायगर्सकडून खेळताना त्याने शतक ठोकलं आणि प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्याचा दावा ठोकला आहे. याच सामन्यात शेवटच्या चेंडूवर कोच्चि ब्लू टायगर्स संघाला विजयही मिळाला. पण असं सर्व असताना संजू सॅमसनच्या जर्सीने लक्ष वेधून घेतलं. कारण संजू सॅमसनच्या जर्सीवर ‘धोनी’ नाव लिहिलं होतं. त्यामुळे हे नाव वाचून चाहत्यांना धक्का बसला. संजू सॅमसनच्या जर्सीवर धोनी हे नाव कसं आणि का छापलं? असा प्रश्न पडला. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात..
कोच्चि ब्लू टायगर्स जर्सीवर छापलेलं नाव हे स्पॉन्सर आहे. हा धोनी एपचा लोगो आहे. हा संघाचा अधिकृत प्रायोजक आहे. सर्व खेळाडूंच्या जर्सीवर हा लोगो आहे. तसाच तो संजूच्या जर्सीवरही आहे. त्यामुळे त्यात वेगळं असं काही नाही. धोनी एप क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने लाँच केलं आहे. धोनीने सुरु केलेलं एक लॉयल्टी आणि फॅन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म आहे. धोनीच्या आयुष्यातील खास क्षण त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी हे व्यासपीठ तयार केलं आहे. हे एप सोशल मिडिया प्लॅटफॉर्मसारखं काम करतं. गुगल प्ले स्टोरवरून तुम्ही मोफत डाऊनलोड करू शकता.
केरळ क्रिकेट लीग स्पर्धेतील संजू सॅमसन हा सर्वात महागडा खेळाडू आहे. 2025 केसीएल लिलावात कोची ब्लू टायगर्सने त्याच्यासाठी 26.75 लाखांची रक्कम मोजली. त्यामुळे या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे तो खेळत असलेल्या संघाचं नेतृत्व त्याचा मोठा भाऊ सॅली सॅमसन करत आहे. दरम्यान, एरिस कोल्लम सेलर्सविरुद्ध खेळताना त्याने शतक ठोकलं. त्याने 51 चेंडूत 121 धावा केल्या. त्यात त्याने 14 चौकार आणि 7 षटकार मारले.