IPL 2026: संजू सॅमसन धावा का करत नाही? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी सांगितलं कारण

आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीला चेन्नई सुपर किंग्सची गाडी भरकटली आहे. आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या तिन्ही सामन्यात संजू सॅमसन फेल गेला आहे. असं असताना प्रशिक्षक फ्लेमिंगने त्याच्याबाबत मोठा खुलासा केला.

IPL 2026: संजू सॅमसन धावा का करत नाही? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी सांगितलं कारण
IPL 2026: संजू सॅमसन धावा का करत नाही? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी सांगितलं कारण
Image Credit source: CSK TWITTER
| Updated on: Apr 06, 2026 | 6:15 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. एका पाठोपाठ एक करत सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स, मग पंजाब किंग्स आणि आता आरसीबीने पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे पराभवाची मालिका पाहून चेन्नई सुपर किंग्सचे चाहते संतापले आहे. या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्सने नव्याने संघ बांधला होता. मात्र अशी कामगिरी पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आहे. तिन्ही पराभवाचं विश्लेषण केलं तर सुमार गोलंदाजी आणि संजू सॅमसन-ऋतुराज गायकवाड यांचा फॉर्म मुख्य कारण ठरले आहे. संजू सॅमसनची गाडी तिन्ही सामन्यात एकेरी धावसंख्येवर अडली आहे. त्याला एकाही सामन्यात दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. या स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोतून रवींद्र जडेजाच्या बदल्यात त्याला संघात घेतलं होतं. पण त्याची कामगिरी हवी तशी होताना दिसत नाही. संजू सॅमसन धावा का करत नाही? याचं कारण चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितलं आहे.

स्टीफन फ्लेमिंग यांनी संजू सॅमसनच्या सुमार कामगिरीबाबत सांगितलं की, जेव्हा तुम्ही एकाच फ्रेंचायझीसोबत दीर्घकाळ खेळता तेव्हा नवीन संघासोबत जुळवून घेणं कठीण होतं. तसा संजू सॅमसन संघात मिसळला आहे. पण अजूनही वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रक्रियेत आहे. संजू सॅमसन लवकरच फॉर्मात परतेल असंही त्यांनी पुढे सांगितलं. स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, “विश्वचषकातील त्याच्या कामगिरीवरून आपण पाहिले आहे की एकदा का तो लयीत आला की अत्यंत धोकादायक ठरू शकतो.” त्यामुळे पिवळ्या जर्सीतील आपला प्रवास सुरू ठेवताना संजू सॅमसनला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असंही ते पुढे म्हणाले.

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 6, पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 7 आणि आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 9 धावा करून बाद झाला. त्याने या तीन सामन्यात मिळून 22 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सची स्पर्धेतील सध्याची स्थिती पाहता संजू सॅमसन फॉर्मात येणं गरजेचं आहे. कारण तिन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची गाडी पावर प्लेमध्येच अडखडली. त्यामुळे इतर खेळाडूंवर दबाव वाढला. संजू सॅमसनने चांगली सुरूवात करून दिली तर संघाला धावगती वाढवण्यास मदत होईल. मागच्या तिन्ही सामन्यात तसं झालं नाही. त्यामुळे संघाची धावगती संथ झाली आणि परिणामी पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना 11 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध होणार आहे. या सामन्यात संजू सॅमसनच्या खेळीकडे लक्ष असेल.

Follow Us