
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी सर्वच फ्रेंचायझींनी आपल्या संघात अपेक्षित बदल केले. पण काही खेळाडूंबाबचचा निर्णय हा अनपेक्षित होता. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. आरसीबीने संघासोबत सात वर्षे असलेल्या मोहम्मद सिराजला रिलीज केलं होतं. मेगा लिलावात त्याच्यासाठी गुजरात टायटन्सने बोली लावली आणि आपल्या संघात घेतलं. पण असं का झालं याबाबत नेमकं कारण समोर आलं नव्हतं. अखेर मोहम्मद सिराजने याबाबत खुलासा केला आहे. आरसीबीचे क्रिकेट डायरेक्टर मो बोबाट यांचा या निर्णयामुळे काय हेतू होता? याबाबत त्यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. बोबाट यांनी सांगितलं की, आरसीबीचा हेतू समतोल आणि भक्कम गोलंदाजी लाइनअप तयार करण्याचा होता. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असेल. भुवनेश्वर कुमारला संघात सहभागी करण्याचा हेतू स्पष्ट होता. कारण त्याचा अनुभव आणि स्विंग गोलंदाजीची क्षमता आरसीबीसाठी महत्त्वाची होती.
बोबाटने पुढे सांगितलं की, मोहम्मद सिराजला रिटेन केलं असतं तर भुवनेश्वर कुमार घेणं कठीण झालं असतं. कारण मेगा लिलावत बजेट आणि खेळाडूंची प्राथमिकतेचं संतुलन राखणं महत्त्वाचं होतं. क्रिकबजशी बोलताना बोबटने स्पष्ट केलं की, ‘सिराज असा खेळाडू होता की त्याच्याबाबत आम्ही सर्वाधिक चर्चा आणि विचार केला होता. भारतीय आंतरराष्ट्रीय गोलंदाज सहज मिळत नाहीत. आम्ही सिराजबाबत सर्व संभाव्य चर्चा केल्या होत्या. मग त्याला रिटेन करण्याचं असो की राईट टू मॅचचा वापर असो. हा काही सोपा निर्णय नव्हता. आम्ही भुवनेश्वरला कसंही करून घेण्याच्या प्रयत्नात होतो. सिराजला संघात ठेवणं कठीण झालं असतं. कधीच एक कारण नसतं. अनेक कारणं यात भूमिका बजावतात.’
बोबाटने पुढे आणखी खुलासा करताना सांगितलं की, ‘ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन हा जखमी असल्याने त्याला रिटेन केलं नाही. जर तो फिट असता तर आम्ही त्याला निश्चितच रिटेन केलं असतं.’ सध्या मोहम्मद सिराज जबरदस्त फॉर्मात आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याने चमकदार कामगिरी केली. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाचव्या सामन्यात विजय मिळवता आला. पण त्याला आशिया कप स्पर्धेसाठी संघात काही स्थान मिळालं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मोहम्मद सिराज आता थेट वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतो.