WI vs Eng 2nd Odi | इंग्लंडसाठी ‘करो या मरो’, कोण जिंकणार दुसरा सामना?

West Indies vs England 2nd Odi | इंग्लंड क्रिकेट टीम आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली आहे. इंग्लंडच्या या विंडिज दौऱ्याची सुरुवात ही पराभवाने झाली. यजमान विंडिजने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडला धोबीपछाड दिला.

WI vs Eng 2nd Odi | इंग्लंडसाठी करो या मरो, कोण जिंकणार दुसरा सामना?
| Updated on: Dec 05, 2023 | 7:15 PM

अँटिगा | वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारी 6 डिसेंबर रोजी एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे सर विवियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. जॉस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होप याच्याकडे विंडिजचं कर्णधारपद आहे. वेस्टइंडिजने या मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे.

इंग्लंडने वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यात 326 धावांचं आव्हान दिलं होतं. वेस्ट इंडिजने हे आव्हान 48.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कॅप्टन शाई होप हा विंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शाईने 83 बॉलमध्ये 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. तर इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली. विंडिजने अशाप्रकारे हा सामना 4 विकेट्सने जिंकला. वेस्ट इंडिजने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे इंग्लंडसाठी दुसरा सामना हा प्रतिष्ठेचा आहे.

इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला विंडिजचा हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असणार आहे.त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांत चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. आता विंडिज या सामन्यासह मालिका जिंकण्यात यशस्वी ठरते की इंग्लंड सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, एलिक अथनाझे, केसी कार्टी, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रुदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, ओशाने थॉमस, रोस्टन चेस, केजॉर्न ओटली आणि मॅथ्यू फोर्ड.

इंग्लंड क्रिकेट टीम | जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ब्रायडन कार्स, रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, टॉम हार्टले, ऑली पोप आणि जॉन टर्नर.