21 सप्टेंबर रोजी हस्तांदोलन होणार की नाही? भारत पाकिस्तान पुन्हा एकदा रविवारी महामुकाबला!

भारत पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना पार पडल्यानंतर आता दोन्ही संघ पुन्हा भिडणार आहे. सुपर 4 फेरीत दोन्ही संघांचा पुन्हा एकदा सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यात हस्तांदोलन करणार की नाही असा प्रश्न आहे.

21 सप्टेंबर रोजी हस्तांदोलन होणार की नाही? भारत पाकिस्तान पुन्हा एकदा रविवारी महामुकाबला!
21 सप्टेंबर रोजी हस्तांदोलन होणार की नाही? भारत पाकिस्तान पुन्हा एकदा रविवारी महामुकाबला!
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 15, 2025 | 10:32 PM

आशिया कप स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा सुपर 4 फेरीत भिडणार आहेत. पण पाकिस्तानने युएईविरुद्धचा सामना जिंकला तर 21 सप्टेंबरला हा सामना होईल हे निश्चित आहे. पण पाकिस्तानने हा सामना गमावला तर स्पर्धेतून आऊट होईल. पण युएई हा संघ पाकिस्तानच्या तुलनेत दुबळा संघ आहे. ट्राय सीरिजमध्ये पाकिस्तानने युएईला धूळ चारली आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानचं पारडं जड आहे. त्यामुळे 21 सप्टेंबरला भारत पाकिस्तान सामना पुन्हा होईल अशी क्रीडाप्रेमींना आशा आहे. पण भारतीय संघाने पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नव्हतं. आता तशीच स्थिती 21 सप्टेंबरला उद्भवू शकते यात काही शंका नाही. त्यामुळे बीसीसीआय आणि भारतीय खेळाडूंची भूमिका काय असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाकिस्तानचा संघ सुपर 4 फेरीसाठी पात्र ठरला तर दोन्ही संघ दुसऱ्यांदा या स्पर्धेत भिडतील. बीसीसीआयच्या सूत्रांनी न्यूज 24 बोलताना सांगितलं की, संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाही. पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत समोर असला तरी भारतीय संघाची अशीच भावना असणार आहे. टॉस आणि वॉर्म-अप दरम्यानही दोन्ही संघांनी एकमेकांशी बोलले नाहीत. त्यामुळे या सामन्यात देखील पाकिस्तान संघाला मान खाली घालून जावं लागणार आहे. दरम्यान, युएईने पाकिस्तानला साखळी फेरीतच पराभूत केलं तर गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी युएई विरुद्धचा सामना करो या मरोची लढाई आहे. 

दुसरीकडे, अंतिम सामन्यात भारतीय संघ पोहोचला तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि एसीसी प्रमुख मोहसिन नकवी यांना अशाच स्थितीला सामोरं जावं लागणार आहे. पीटीआयने सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलं की, जर भारतीय संघ 28 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. तर खेळाडू मोहसिन नकवी यांच्यासोबत प्रेझेंटेशन व्यासपीठ शेअर करणार नाही. एसीसी प्रमुख असल्याने नकवी विजेत्या संघाला ट्रॉफी देऊ शकतात.