Video : टी20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये कमबॅक करणार का? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं की…

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रोहित शर्मा आता आपलं लक्ष वनडे आणि कसोटी क्रिकेटकडे केंद्रीत करत आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जवळ आहेत. यासाठी भारत आणि श्रीलंका वनडे मालिकेतून प्रवास सुरु होणार आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माने टी20 फॉर्मेटबाबत मोठं विधान केलं आहे.

Video : टी20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये कमबॅक करणार का? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं की...
| Updated on: Aug 01, 2024 | 5:18 PM

भारताने 17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टी20 विश्वचषकावर नाव कोरलं. तसेच गेल्या 11 वर्षांपासून सुरु असलेला आयसीसी चषकाचा दुष्काळही संपवला आहे. वर्ल्डकप जिंकताच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर टी20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवच्या हाती सोपवण्यात आलं आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया 2026 टी20 वर्ल्डकप खेळणार असल्याचं बोललं जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची टी20 मालिका 3-0 जिंकली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात वनडे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. हा सामना 2 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी त्याला टी20 फॉर्मेटमधून निवृत्तीबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने या प्रश्नाला आपल्या शैलीत उत्तर दिलं.

“मला अजूनही असं वाटते की मला टी20 क्रिकेटमधून आराम दिला गेला आहे. असं भुतकाळात घडलं आहे. तसंच मोठी स्पर्धा जवळ आली की मी पुन्हा त्या स्पर्धेसाठी तयार झालो आहे. मला अजून तरी असंच वाटते. मला अजूनही असं वाटते की मी फॉर्मेटमधून आऊट झालेलो नाही.”, असं वनडे कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. रोहित शर्मा आता टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं कठीण आहे. कारण त्याने मिश्किलपणे या प्रश्नाचं उत्तरं दिलं आहे. पण त्याच्या चाहत्यांना त्याने कमबॅक करावं असंच वाटत आहे. पण आता ते काही शक्य नाही. दुसरीकडे, रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

रोहित शर्मा 159 टी20 सामने खेळला आहे. यात त्याने 4231 धावा केल्या आहेत. यात पाच शतकं आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये 257 सामने खेळला असून त्याने 5054 धावा केल्या आहेत. यात 2 शतकं आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने पहिला टी20 सामना इंग्लंडविरुद्ध 19 सप्टेंबर 2007 रोजी खेळला होता. तर शेवटचा टी20 सामना 29 जून 2024 रोजी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळला. हा टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने जेतेपद मिळवलं होतं.