KKR vs LSG सामना होणार की नाही? बीसीसीआयपुढे मोठा पेच, झालं असं की…

आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्याआधीच त्याला नजर लागते की काय अशी स्थिती आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यावर मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही सावट आहे. बीसीसीआयला याबाबतची सूचना मिळाली असून तारीख आणि ठिकाण बदलण्याची वेळ येऊ शकते. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते...

KKR vs LSG सामना होणार की नाही? बीसीसीआयपुढे मोठा पेच, झालं असं की...
कोलकाता नाईट रायडर्स
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 19, 2025 | 3:40 PM

आयपीएल 2025 स्पर्धेची उत्सुकता तासागणिक वाढत चालली आहे. 22 मार्चला पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. असं असताना बीसीसीआय वेगळ्याच अडचणीत आहे. कारण रिपोर्टनुसार, बीसीसीआयवर वेळापत्रक बदलण्याची वेळ येऊ शकते. 6 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना राम नवमीला होत आहे. यामुळे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने बीसीसीआयकडे सामन्याचं वेळापत्रक बदलण्यासाठी विनंती केली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने कोलकाता पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनेनंतर ही माहिती दिली आहे. प्रशासनाने स्पष्ट केलं की, रामनवमीच्या उत्सव असल्याने सामन्यांसाठी योग्य ती सुरक्षा देऊ शकत नाही. स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष स्नेहाशीष गांगुलीने सांगितलं की, ‘आम्ही प्रशासन आणि पोलिसांसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, रामनवमी असल्याने पुरेशी सुरक्षा देणं शक्य नाही. आम्ही बीसीसीआयकडे सामन्याची वेळ बदलण्याची मागणी केली आहे. आशा आहे की, पुढच्या काही दिवसाता याबाबत स्पष्ट काय ते होईल.’

दुसरीकडे, बीसीसीआयचं या सूचनेमुळे टेन्शन वाढलं आहे. वेळापत्रक नियोजित असल्याने सामन्याची वेळ बदलणं खूपच कठीण आहे. त्यामुळे हा सामना दुसरीकडे शिफ्ट करण्याचा विचार चालला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, ‘आम्ही क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडून सूचना मिळाली आहे आणि आम्ही सर्व शक्यतांचा विचार करत आहोत.’ बीसीसीआय संबंधित संघ आणि लॉजिस्टिक्स टीमसोबत चर्चा करत आहे आणि लवकरच यावर तोडगा निघेल.

मागच्या वर्षीही कोलकात्याचा सामना रामनवमीच्या दिवशी आला होता. तेव्हाही सामन्याची वेळ बदलावी लागली होती. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, ‘सामन्याच्या तिकिटांची मागणी अधिक आहे. लवकरच आम्ही याबाबत तोडगा काढू.’ दोन्ही संघांमध्ये एका आठवड्याचं अंतर आहे आणि त्यामुळे पर्यायी तारखेचा विचार केला जात आहे. कोलकाता 11 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स, तर लखनौ 12 एप्रिलला गुजरात टायटन्सशी सामना करणार आहे. त्यामुळे आता ठिकाण बदललं जातं की वेळ हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.