
वूमन्स इंडिया ए टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. राधा यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इंडिया ए वूमन्स टीमचं नेतृत्व करत आहे. ऑस्ट्रेलिया ए वूमन्सने भारतीय महिला संघाचा 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवला. त्यानतंर आता उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. वूमन्स इंडिया ए टीम या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कांगारुंवर मात करत विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्यासह टी 20i मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. त्यामुळे आता महिला ब्रिगेड सलग तिसरा विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार? की कांगारु शेवटच्या सामन्यात विजय मिळवत लाज राखणार? हे सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा रविवारी 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमधील ब्रिस्बेनमधील इयान हिली ओव्हल इथे खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरुवात होईल. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात येईल. राधा यादव हीच्याकडे भारतीय अ महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर ताहलिया मॅकग्राथ हीच्याकडे यजमानांच्या कर्णधारपदाची धुरा आहे.
भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने केला. भारताने या दौऱ्यातील दोन्ही मालिका (टी 20i आणि वनडे) जिंकल्या. मात्र त्यानंतर इंडिया ए वूमन्स टीमला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तशीच सुरुवात करता आली नाही. ऑस्ट्रेलियाने इंडिया ए चा टी 20 सीरिजमध्ये 3-0 ने सुपडा साफ केला.
ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या सामन्यात 13 धावांनी पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात भारताने घोर निराशा केली. भारताला चक्क टी 20 सामन्यात 114 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने यासह ही मालिका जिंकली.तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा अवघ्या 4 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने यासह ही मालिकाच 3-0 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली.
भारताने त्यानंतर वनडे सीरिजमध्ये जोरदार कमबॅक केलं. भारताने सलग 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. आता तिसरा आणि अंतिम सामना जिंकून महिला ब्रिगेड ऑस्ट्रेलियाची अचूक परतफेड करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.