
वूमन्स टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने इतिहास घडवला आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेवर तिसर्या टी 20i सामन्यात 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीतने या विजयासह ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौर या विजयासह सर्वाधिक टी 20i सामने जिंकणारी कर्णधार ठरली आहे. हरमनने ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंग हीचा कर्णधार म्हणून सर्वाधिक टी 20i सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. हरमनप्रीतने आतापर्यंत कर्णधार म्हणून 77 टी 20i सामने जिंकले आहेत. तर माजी कर्णधार मेग हीने ऑस्ट्रेलियाला 100 सामन्यांमधून 76 टी 20i सामन्यांमध्ये विजयी केलं होतं.
हरमनप्रीतचा श्रीलंकेविरुद्धचा कारकीर्दीतील कर्णधार म्हणून एकूण 130 वा सामना होता. हरमनप्रीतने या सामन्यात भारताला विजयी केलं. हा भारताचा 77 वा टी 20i विजय ठरला. हरमनप्रीत कर्णधार झाल्यापासून तिच्या कामगिरी आणखी सुधारली. अनेक खेळाडूंवर नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत असताना दबाव येतो. त्याचा परिणाम हा वैयक्तिक कामगिरीवर दिसतो. मात्र हरमनप्रीतने चमकदार कामगिरी केली. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारताने अवघ्या काही आठवड्यांआधी वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.
हरमनप्रीत कौर : 77 सामने
मेग लॅनिंग : 76 सामने
हीथर नाइट : 72 सामने
चार्लोट एडवर्ड्स : 68 सामने
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध डबल धमाका केला. भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. भारताने या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने आघाडी मिळवली आहे.
श्रीलंकेने भारतासमोर विजयसाठी 113 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 40 बॉलआधी 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताने 13.4 ओव्हरमध्ये 115 धावा केल्या आणि 8 विकेट्सने सामना जिंकला. शफाली वर्मा हीने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. शफालीने नाबाद 79 धावांची खेळी केली. तर हरमनप्रीतने नाबाद 21 धावा करत भारताच्या विजयात योगदान दिलं. आता उभयसंघातील चौथा सामना हा रविवारी 28 डिसेंबरला होणार आहे.
या सामन्याचं आयोजन हे तिरुवनंतरपुममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आता टीम इंडिया हा सामना जिंकून विजयी चौकार लगावणार की श्रीलंका पलटवार करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.