IND vs SA: टीम इंडियाची विजयी सलामी, दक्षिण आफ्रिकेचा 143 धावांनी उडवला धुव्वा

India Women vs South Africa Women 1st ODI Match Result: टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेवर 143 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे.

IND vs SA: टीम इंडियाची विजयी सलामी, दक्षिण आफ्रिकेचा 143 धावांनी उडवला धुव्वा
India Women vs South Africa Women 1st ODI
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 16, 2024 | 9:11 PM

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात 143 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आशा शोभनाच्या धारदार बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकेने गुडघ टेकले. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 37.4 ओव्हरमध्ये 122 धावांवर गुंडाळलं आणि 143 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बांधून ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या फक्त चौघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. दोघी भोपळाही फोडू शकल्या नाहीत. तर 5 जणींना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सुने लुस हीने सर्वाधिक 33 धावा केल्या. सिनालो जफा हीने नाबाद 27 धावा जोडल्या. मारिझाने कापने 24 आणि ताझमिन ब्रिट्सने 18 रन्स केल्या. तर टीम इंडियाकडून आशा सोभना हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्माने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रेणूका सिंह, पूजा वस्त्राकर आणि राधा यादव या तिघींनी प्रत्येक 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर या तिघींनी केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला 8 विकेट्स गमावून 265 धावांपर्यंत मजल मारता आली. या तिघींनी टीम इंडियाची लाज राखली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर 250 पार धावांचं आव्हान ठेवण्यात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियासाठी स्मृतीने सर्वाधिक धावा केल्या. स्मृतीने 127 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 117 धावा केल्या. दीप्ती शर्माने 37 रन्स केल्या. तर पूजा वस्त्रकारने 31 धावांची नाबाद खेळी केली. आशा सोभनाने नॉट आऊट 8 रन्स केल्या. तर इतरांना काही खास करता आलं नाही.

टीम इंडियाची विजयी सुरुवात

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, ॲनेरी डेर्कसेन, नॉन्डुमिसो शांगासे, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा आणि अयाबोंगा खाका.