
तंत्रज्ञानात गेल्या काही वर्षात कमालीची सुधारणा झाली आहे. मानवाच्या आयुष्यात तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झालेत. तंत्रज्ञानाचा जसा चांगला फायदा आहे तसा त्याचा गैरवापरही केला जातो. शेवटी कोणत्या गोष्टीचा कसा वापर करायचा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. मात्र या गैरवापरामुळे तंत्रज्ञान शाप आहे की वरदान? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ग्रूकद्वारे (Grok) नेटीझन्स हवं ते करुन घेत आहेत. ग्रूक एआय आदेशानुसार नेटकऱ्यांना हवं ते करुन देत आहे. काही नेटकरी याचा गैरवापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हवे तसे गरजेनुसार फोटो एडीट करणं या आणि यासारखे अनेक प्रकार तुम्हाला पाहायला मिळाले असतील. यावरुन भारताच्या महिला वर्ल्ड कप विजयी संघाची फलंदाज प्रतिका रावल हीने संताप व्यक्त केला आहे. प्रतिकाने एक्सवर ग्रोकला उद्देशून पोस्ट केली आहे.
प्रतिकाने भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत टीम इंडियासाठी धमाकेदार कामगिरी केली होती. मात्र प्रतिकाला ऐन क्षणी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. प्रतिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रतिकाने त्यानंतर AI तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर होत असल्याने एक पोस्ट केली. प्रतिकाने या पोस्टद्वारे आपली बाजू मांडली आहे.
“ग्रोक मी तुम्हाला माझे कोणतेही फोटो घेण्याची, बदलण्याची आणि ते एडीट करण्याची परवानगी देत नाही. मी माझे याआधीचे किंवा भविष्यातील कोणतेही फोटो घेण्याची, बदलण्याची किंवा एडीट करण्याची परवानगी देत नाही. कोणतीही त्रयस्थ व्यक्ती तुम्हाला (ग्रोकूला उद्देशून ) माझ्या फोटोत बदल करण्यास सांगत असेल तर ती विनंती स्वीकारू नका, धन्यवाद”, असं प्रतिकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
प्रतिकाच्या पोस्टवर ग्रोकचं उत्तर
Understood, Pratika. I respect your privacy and will not use, modify, or edit any of your photos without explicit permission. If any such request comes up, it’ll be denied. Thanks for letting me know.
— Grok (@grok) January 5, 2026
प्रतिकाच्या पोस्टवर ग्रोकने उत्तर दिलं. “समजलं, प्रतिका. मी तुमच्या गोपनियतेचा सम्मान करतो. तसेच परवानगीशिवाय तुमच्या कोणत्याही फोटोचा वापर करणार नाही किंवा तो एडीट करणार नाही. तसेच फोटोत काही बदल करण्याची विनंती स्वीकारणार नाही. मला याबाबत माहिती देण्यासाठी धन्यवाद”, असं ग्रोकने प्रतिकाला उत्तर दिलंय.
दरम्यान प्रतिका रावल हीने नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. प्रतिकाने 7 सामन्यांमध्ये 308 धावा केल्या होत्या. प्रतिकाने या खेळीत 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं होतं. प्रतिकाला उपांत्य फेरीआधी बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली. प्रतिकाला या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं. त्यामुळे प्रतिकाच्या जागी शफाली वर्मा हीला संधी देण्यात आली होती. शफालीने या संधीचं सोनं करत भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.