
वूमन्स टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील आपला तिसरा सामना गुरुवारी 9 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना आंधप्रदेशमधील विशाखापट्टणम येथील एसीए व्हीडीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य आहे. भारताने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताकडे दक्षिण आफ्रिकेवर मात करुन विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. मात्र टीम इंडिया सलग 2 विजयानंतरही आपल्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियाची स्टार आणि मॅचविनर खेळाडू कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.
वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला विजयी सुरुवात करुन देणारी अमनज्योत कौर कमबॅकसाठी सज्ज आहे. अमनज्योतचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून कमबॅक होणार असल्याचे संकेत भारतीय खेळाडूकडून देण्यात आलेत. सामन्याच्या पूर्वसंध्येला अर्थात 8 ऑक्टोबरला पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत टीम इंडियाची बॅट्समन जेमीमाह रॉड्रिग्स हीने अमनज्योतच्या कमबॅकचे संकेत दिले.
“आपण आतापर्यंत सर्व सामने पाहिले असतील. आमची सलामी भागीदारी चांगली राहिली आहे. प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या जोडीने 1 हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्या कामगिरीबाबत चिंता नाही. आमच्या बॅटिंगमध्ये खोली आहेत. अमनजोत कौर, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे”, अशी प्रतिक्रिया जेमीमाहने भारतीय फलंदाजीबाबत दिली.
“अमनजोत आता ठीक आहे. तिला दुखापत झाली नव्हती. ती आजारी होती आणि आता ती बरी आहे”, जेमीमाहने अशी माहिती दिली. अमनजोतला आजारपणामुळे पाकिस्तान विरुद्ध 5 ऑक्टोबरला झालेल्या सामन्याला मुकावं लागलं होतं. अमनजोतच्या जागी तेव्हा प्लेइंग ईलेव्हनमध्ये रेणुका सिंह ठाकुर हीचा समावेश करण्यात आला होता.
अमनजोतने वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेची चाबूक सुरुवात केली. अमनजोतने श्रीलंकेविरुद्ध 30 सप्टेंबरला निर्णायक क्षणी चिवट खेळी केली होती. अमनजोतने 56 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. अमनजोतने बॅटिंगने कमाल केल्यानंतर बॉलिंगनेही योगदान दिलं होतं. अमनजोतने 37 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली होती. मात्र त्यानंतर अमनजोत कौर हीला पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला आजारपणामुळे मुकावं लागलं होतं. मात्र आता अमनजोत सज्ज झाली आहे. त्यामुळे आता अमनजोतचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.