WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दक्षिण अफ्रिकेची प्लेइंग 11 जाहीर, हे खेळाडू करणार ऑस्ट्रेलियाशी दोन हात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या संघांनी कंबर कसली आहे. सामना सुरु होण्याच्या एक दिवसाआधीच दक्षिण अफ्रिकेने प्लेइंग 11 जाहीर केली आहे. कोणते खेळाडू संघात आहे ते जाणून घ्या.

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दक्षिण अफ्रिकेची प्लेइंग 11 जाहीर, हे खेळाडू करणार ऑस्ट्रेलियाशी दोन हात
टेम्बा बावुमा
Image Credit source: ICC
| Updated on: Jun 10, 2025 | 5:32 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात कोणाचं पारडं जड आहे हे सांगणं आताच कठीण आहे. मागची आकडेवारी काही असली तर दोन्ही वेगळ्याच देशाच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकतं. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने आणि ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. दोन्ही वेळेस भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठलेला दक्षिण अफ्रिका संघ आमनेसामने येणार आहे. दक्षिण अफ्रिका आयसीसी चषकाचं सुतक सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. कारण आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात 1998 नंतर एकही जेतेपद मिळालेलं नाही. जवळपास 27 वर्षानंतर पुन्हा एकदा जेतेपदाची संधी चालून आली आहे. आता ऑस्ट्रेलियावर अंतिम फेरीत कशी मात करणार याकडे लक्ष लागून आहे. असं असताना दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सामन्याच्या एक दिवस आधीच प्लेइंग 11 जाहीर केली आहे.

सलामीला कर्णधार टेम्बा बावुमासोबत एडन मार्करम येणार आहे. सामन्याच्या सुरुवात टेम्बा बावुमा करणार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रायन रिकेल्टनला संधी देण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकावर वियान मुल्डर फलंदाजीसाठी येईल. तर पाचव्या क्रमांकासाठी ट्रिस्टन स्टब्सला पसंती देण्यात आली आहे. सहाव्या क्रमांकावर म्हणजेच मधल्या फळीत डेविड बेडिंगहॅम धुरा सांभाळेल. तर काइल वेरीन सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत मार्को यानसेन असेल आणि तो आठव्या क्रमांकावर येईल. तर केशव महाराजकडे फिरकीची जबाबदारी असेल. कगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने एकही कसोटी गमावलेली नाही. त्याच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने 9 कसोटी खेळल्या आहेत. त्यापैकी 8 सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. टेम्बा बावुमाची विजयी टक्केवारी 88.8 इतकी आहे. आता अंतिम फेरीत कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरीन, मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.