WPL 2025 : पंचांशी हुज्जत महागात,बीसीसीआयकडून कर्णधारावर कारवाई

WPL 2025 Mumbai Indians vs UP Warriorz : वूमन्स प्रीमियर लीगमधील तिसऱ्या हंगामात पंचासह हुज्जत घालणं मुंबईच्या कर्णधाराला महागात पडलं आहे. जाणून घ्या.

WPL 2025 : पंचांशी हुज्जत महागात,बीसीसीआयकडून कर्णधारावर कारवाई
Mumbai Indians Flag
Image Credit source: Mipaltan x account
| Updated on: Mar 07, 2025 | 9:27 PM

खेळ कोणताही असो, पंचांचा निर्णय अंतिम असतो. काही निर्णयाबाबत खेळाडू रिव्हीव्यू घेऊ पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात. मात्र काही निर्णय मान्य करावेच लागतात. मात्र अनेकदा पंचांकडूनही चूक होते. तर काही वेळा खेळाडूंनाही अतिशहाणपणा नडतो. खेळाडू आणि पंच यांच्यात अनेकदा वादावादी होते. पंचाची चूक असो किंवा नसो, मात्र खेळाडूंवर दंडात्मक कारवाई होतेच. अशीच कारवाई मुंबईच्या कर्णधारावर करण्यात आली आहे. वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामात (WPL 2025) कॅप्टन हरमनप्रीत कौरवर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली आहे.

नक्की काय झालं?

डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामातील 16 व्या सामन्यात गुरुवारी 6 मार्च रोजी मुंबई विरुद्ध यूपी आमनेसामने होते. सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार हरमनप्रीतने पंचाच्या निर्णयावरुन नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हरमनला सामन्याच्या एकूण मानधनापैकी 10 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

स्लो ओव्हर रेटमुळे सर्कलबाहेर 3 पेक्षा अधिक खेळाडू ठेवता येणार नाहीत, असं अंपायर अजितेष अर्गल यांनी 19 व्या ओव्हरनंतर हरमनला सांगितलं. त्यामुळे हरमनप्रीत पंचासह हुज्जत घालायला लागली. हरमनप्रीतला यात अमेलिया केर हीची साथ मिळाली. हरमनने पंचासह वाद घातल्याने तिच्याकडून 2.8 या नियमातील लेव्हल 1चं उल्लंघन झालं. त्यामुळे बीसीसीआयने हरमनला या कृतीनंतर दणका दिला. हरमनने आपली चूक मान्य केली. 2.8 नियमातील लेव्हल 1 मध्ये, सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाविरुद्ध वाद घातल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

हरमनप्रीतची अंपायरसह हुज्जत, व्हीडिओ व्हायरल

मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदीया.

यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेत्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहर सुलताना आणि क्रांती गौड.