WPL 2025 : बंगळुरुचा मुंबईवर 11 धावांनी विजय, दिल्लीची अंतिम फेरीत धडक

Mumbai Indians Women vs Royal Challengers Bengaluru Women Match Result : बंगळुरुने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात मुंबईवर 11 धावांनी मात केली. बंगळुरुच्या विजयासह दिल्लीने सलग तिसऱ्यांदा थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

WPL 2025 : बंगळुरुचा मुंबईवर 11 धावांनी विजय, दिल्लीची अंतिम फेरीत धडक
wpl 2025 dc and rcb
Image Credit source: @wplt20 and @RCBTweets
| Updated on: Mar 11, 2025 | 11:33 PM

स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील (WPL 2025) साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे. बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईकडून या धावांचा शानदार पाठलाग करण्यात आला. मात्र मुंबईचे प्रयत्न अपुरे पडले. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 188 धावाच करता आल्या. मुंबईला या सामन्यात विजय मिळवून दिल्लीला पछाडून थेट अंतिम फेरीत पोहचण्याची संधी होती. मात्र बंगळुरुने मुंबईवर विजय मिळवल्याने दिल्लीला फायदा झाला. त्यामुळे दिल्लीचं पॉइंट्स टेबलमधील पहिलं स्थान कायम राहिलं. दिल्ली यासह सलग आणि एकूण तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचली.

मुंबईची बॅटिंग

कर्णधार स्मृती मंधाना हीच्या 53 आणि एलिसा पेरी हीने 49 धावा केल्या. तसेच रिचा घोष (36)* आणि जॉर्जिया वेरेहम हीच्या (31)* धावांच्या जोरावर बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. मुंबईकडून 200 धावांचा पाठलाग करताना नॅट सायव्हर ब्रंट हीने सर्वाधिक 69 धावांचं योगदान दिलं. तसेच अपवाद वगळता इतरांनीही अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही. सजीवन सजना हीने 23, कॅप्टन हरमनप्रीत कौर 20, हॅली मॅथ्यूज 19, अमनज्योत कौर 17 आणि संस्कृती गुप्ता हीने 10 धावांचं योगदान दिलं.

मुंबईच्या या 5 फलंदाजांनी आणखी काही धावा जोडल्या असत्या तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. मात्र बंगळुरुच्या गोलंदाजांनी तसं करुन दिलं नाही. बंगळुरुसाठी स्नेह राणा हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. कीम गर्थ आणि एलिसा पेरी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर हेदर ग्रॅहम आणि जॉर्जिया वेरेहम या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

दिल्लीची हॅटट्रिक, फायनलमध्ये धडक

दरम्यान बंगळुरुच्या विजयासह दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीने यासह हॅटट्रिक पूर्ण केली. दिल्ली या स्पर्धेतील तिन्ही हंगामात थेट सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचली. तर आता अंतिम फेरीतील दुसरा संघ कोण? हे एलिमिनेटर सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. एलिमिनेटर 13 मार्चला मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात होणार आहे.

मुंबई इंडियन्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल आणि पारुनिका सिसोदिया.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सभिनेनी मेघना, स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, हेदर ग्रॅहम, स्नेह राणा, किम गर्थ, प्रेमा रावत आणि जोशिता व्ही.जे.