
वूमन्स प्रीमियर लीग या स्पर्धेतील चौथ्या मोसमाला (WPL 2026) शुक्रवार 9 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील चौथ्या मोसमात एकूण 5 संघांमध्ये 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान 22 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील आणि वडोदरातील बीसीए स्टेडियम, कोतंबी इथे करण्यात आलं आहे. मोसमातील पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असा होणार आहे. या सलामीच्या सामन्यात 2 चॅम्पियन संघ भिडणार आहेत. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्संच नेतृत्व करणार आहे. स्मृती मंधाना हीच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा आहे. हा सामना किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना शुक्रवारी 9 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमध्ये होणार आहे. काही आठवड्यांआधी भारताने याच मैदानात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तेव्हा स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर भारतासाठी एकत्र खेळल्या होत्या. मात्र आता डब्ल्यूपीएलमध्ये हे दोन्ही स्टार खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांची या 2 स्टार आणि कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार अॅपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
दरम्यान या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई विरुद्ध आरसीबी या दोन्ही संघांमध्ये एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने या 7 पैकी सर्वाधिक सामन्यांत विजय मिळवला आहे. मुंबईने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 3 वेळा मुंबईवर मात केली आहे. त्यामुळे 1 सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तोडीसतोड आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या दोन्ही संघात पहिल्याच सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.