
टीम इंडिया दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली . पहिल्या पर्वात न्यूझीलंडने आणि दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत आहे. सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पुन्हा स्थान मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली जेतेपद मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. पण टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर कायम राहिल का? हा देखील प्रश्न आहे. कारण प्रत्येक कसोटी मालिकेनंतर गुणतालिकेवर फरक पडणार आहे. इंग्लंड वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील निकालामुळेही गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना होण्यापू्र्वीच ही मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली. कारण विजयी टक्केवारीत आणखी उलथापालथ झाली तर भारताला फटका बसू शकतो.
भारतीय संघाने आतापर्यं 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि 1 सामना अनिर्णित ठरला आहे. भारतीय 74 गुण आणि 68.52 च्या विजयी टक्केवारीसह आघाडीवर आहे. तर ऑस्ट्रेलियाने एकूण 12 सामने खेळले असून 8 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघ 90 गुण आणि 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. असं असलं तरी अंतिम फेरीच्या शर्यतीत न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंड हे संघ देखील आहेत. न्यूझीलंड आणि श्रीलंकेची विजयी टक्केवारी 50.00 इतकी आहे. पाकिस्तानची 36.66, तर इंग्लंडची 31.25 इतकी विजयी टक्केवारी आहे.
Source : ICC
भारतीय संघाचा अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी तीन कसोटी मालिका शिल्लक आहे. या तीन पैकी 2 मालिका काहीही करून जिंकाव्या लागतील. इतकंच काय तर त्यात व्हाईट वॉश देणं गरजेचं आहे. जेणेकरून विजयी टक्केवारी मजबूत होईल. भारतीय बांग्लादेशसोबत 2 सामन्यांची, न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ भारतात येणार आहेत. त्यामुळे त्यांना व्हाईट वॉश देणं शक्य होईल. पण पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत कस लागेल. दुसरीकडे, उर्वरित 10 कसोटी सामन्यापैकी 6-7 सामने जिंकले तर टीम इंडियाचं तिकीट पक्कं होईल. त्यामुळे न्यूझीलंड आणि बांग्लादेशविरुद्धचे पाच सामने जिंकले तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दडपण कमी होईल.