Video : इंग्लंडच्या गोलंदाजाने यशस्वीच्या बॅटचे केले दोन तुकडे, जाणून घ्या किंमत

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली आहे. या सामन्यात बचावात्मक शॉट खेळताना बॅटचे दोन तुकडे झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे.

Video : इंग्लंडच्या गोलंदाजाने यशस्वीच्या बॅटचे केले दोन तुकडे, जाणून घ्या किंमत
इंग्लंडच्या गोलंदाजाने टाकलेला चेंडूने यशस्वीच्या बॅटचे केले दोन तुकडे, जाणून घ्या किंमत
Image Credit source: Clive Mason/Getty Images
| Updated on: Jul 23, 2025 | 5:48 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये खेळला जात आहे. हा सामना काहीही करून भारताला जिंकावा लागणार आहे. असं असताना भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने या सामन्यात सावध फलंदाजीला सुरुवात केली आहे. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल नेहमीपेक्षा सावध खेळताना दिसत आहे. असं असताना 9व्या षटकात एक विचित्र प्रकार घडला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कारण बचावातम्क खेळताना त्या बॅटचं हँडल तुटलं. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बचावात्मक खेळताना यशस्वी जयस्वालची बॅट तुटली.

ख्रिस वोक्सने टाकलेल्या चेंडूला या खेळपट्टीवर अतिरिक्त उसळी मिळाली. यानंतर चेंडू थेट बॅटच्या हँडलला लागला. त्यामुळे बॅटचं हँडल तुटलं. बॅट तुटल्याचं पाहून यशस्वी जयस्वाल काही क्षण बॅटकडे पाहात राहीला. मैदानात उपस्थित खेळाडू, पंच आणि चाहतेही आश्चर्यचकीत झाले. जयस्वालने बॅटची स्थिती एकदा पाहीली आणि बॅट बदलण्यासाठी डगआउटकडे इशारा केला. यानंतर करुण नायर तात्काळ धाव घेत चार बॅट घेऊन मैदानात आला. यापैकी एक बॅट त्याने निवडली. ही घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, यशस्वी जयस्वालच्या या बॅटची किंमत 1 लाख रुपये आहे. बॅटची किंमत ऐकून क्रीडाप्रेमी आणि नेटकरी प्रतिक्रिया नोंदवत आहेत. काही जणांनी ख्रिस वोक्सची स्तुती केली. तर काही जण यशस्वी जयस्वालच्या बचावात्मक शॉट्सचा उदो उदो करत आहेत. एक चाहत्यााने लिहिलं की, जयस्वालची बॅट तर तुटली, पण उत्साह मात्र कायम आहे. दरम्यान, भारताने लंच ब्रेकपर्यंत 78 धावांची खेळी केली आहे. यात एकही विकेट गमावला नाही. केएल राहुलने 82 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 40, तर यशस्वी जयस्वालने 74 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 36 धावा केल्या आहेत.