IND vs ENG 4th Test: गिलने गोड बोलून करुण नायरला काढला बाहेर, सामन्याआधी म्हणाला होता की…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर मैदानात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर संघातील बदल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. खासकरून करुण नायरला बाहेर केल्याने शुबमन गिलच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

भारताला चौथ्या कसोटी सामन्यातही नाणेफेकीची साथ मिळाली नाही. शुबमन गिलने कसोटी कर्णधारपद हाती घेतल्यानंतर सलग चौथ्यांदा कौल गमावला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर शुबमन गिलने नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर केली. या प्लेइंग 11 मधील तीन बदल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दोन बदल होणार हे निश्चित होतं. पण तिसरा बदल होईल याबाबत कल्पना देखील नव्हती. कारण प्लेइंग 11 मधून ज्या खेळाडूला बाहेर काढलं त्याची स्तुती त्याने या सामन्यापूर्वी केली होती. त्याच्या स्तुतीमुळे करुण नायर चौथ्या कसोटी सामन्यात प्लेइंग 11 चा भाग असेल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण त्याच्याऐवजी संघात साई सुदर्शनला संधी देण्यात आली होती. त्यामुळे शुबमन गिलचा हा निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. मँचेस्टर कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत करुण नायरच्या फलंदाजीची स्तुती शुबमन गिलने केली होती.
शुबमन गिलने सांगितलं होतं की, ‘आम्हाला वाटतं की तो चांगली फलंदाजी करत आहे. त्याला सुरुवातीच्या सामन्यात आवडत्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या फलंदाजीत काहीच अडचण नाही. पण एकदा का 50 धावापर्यंत पोहोचण्यास सक्षम झाला तर तो योग्य लयीत येतो आणि मोठी धावसंख्या उभी करू शकतो.’ शुबमन गिलचं हे वक्तव्य पाहता करुण नायरला चौथ्या कसोटी सामन्यात संधी देईल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी देण्यात आली आहे. साई सुदर्शनला पहिल्या कसोटीत संधी दिली होती. मात्र त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात डावलण्यात आलं.
करुण नायरला तीन कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने खातंही खोललं नाही. दुसऱ्या डावात 20 धावा करून बाद झाला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 31 आणि दुसऱ्या डावात 26 धावांवर बाद झाला. तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 40 आणि दुसर्या डावात 14 धावा करून बाद झाला. खरं तर लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याच्याकडून फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र पदरी निराशा पडली. हा सामना भारताने अवघ्या 22 धावांनी गमावला.
