IND vs SA : टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय, धर्मशालेत 10 वर्षानंतर पराभवाची परतफेड, दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम
India vs South Africa 3rd T20I Match Result : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत धर्मशालेत हॅटट्रिक पूर्ण केली आहे. टीम इंडियाचा हा या मैदानातील सलग तिसरा टी 20i विजय ठरला आहे.

दुसऱ्या टी 20i सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने फ्लॉप कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाने धर्मशालेतील तिसर्या आणि निर्णायक सामन्यात पलटवार केला आहे. टीम इंडियाने धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 118 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 25 बॉलआधी पूर्ण केलं. टीम इंडियाने 15.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 120 धावा केल्या. टीम इंडियाने यासह हा सामना जिंकला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. तसेच टीम इंडियाने या विजयासह 2015 मधील पराभवाची परतफेड केली. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 2015 साली याच मैदानात पराभूत केलं होतं.
दक्षिण आफ्रिकेचं पॅकअप
या मालिकेत टीम इंडियाच्या बाजूने सलग दुसऱ्यांदा नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी कर्णधार सूर्याच्या या निर्णयाला योग्य ठरवलं. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 117 रन्सवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या 100 धावा तरी होणार की नाहीत? अशी स्थिती होती. मात्र कर्णधार एडन मार्रक्रम याने संकटमोचकाची भूमिका बजावली आणि दक्षिण आफ्रिकेची लाज राखली.
एडनने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 61 धावा केल्या. तर डोनोवेन फेरारा याने 20 तर एनरिच नॉर्खिया याने 12 धावांचं योगदान दिलं. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियासाठी अर्शदीप सिंह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे याने 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाची चाबूक सुरुवात
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला आक्रमक सुरुवात दिली. या दोघांनी 60 धावांची भागीदारी केली.त्यानंतर अभिषेक शर्मा 35 धावांवर आऊट झाला. त्यानंतर शुबमन आणि तिलक वर्मा आणि शुबमन या दोघांनी 38 चेंडूत 32 धावांची भागीदारी केली. शुबमन 28 बॉलमध्ये 28 रन्स करुन आऊट झाला.
तिलक आणि सूर्यकुमार यादव या जोडीने 18 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. सूर्यकुमार टीम इंडियाला लवकर विजयी करण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. सूर्याने 12 धावा केल्या. तर तिलक आणि शिवम दुबे या जोडीने भारताला विजयी केलं. तिलकने नाबाद 25 आणि शिवमने नॉट आऊट 10 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन आणि कॉर्बिन बॉश या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
