
श्रीलंका क्रिकेट टीमने चरिथ असलंका याच्या नेतृत्वात झिंबाब्वे दौऱ्यात सलग तिसरा विजय मिळवला आहे. श्रीलंकेने झिंबाब्वेला एकदिवसीय मालिकेत 2-0 ने क्लिन स्वीप केलं. त्यानंतर श्रीलंकेने आज 3 सप्टेंबर रोजी झिंबाब्वेवर पहिल्या टी 20I सामन्यात 4 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली आहे. झिंबाब्वेने श्रीलंकेला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 5 चेंडूंआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. श्रीलंकेने 19.1 ओवहरमध्ये 177 धावा केल्या. श्रीलंकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
पाथुम निसांका, कुसल मेंडीस आणि कामिंदु मेंडीस या त्रिकुटाने बॅटिंगने श्रीलंकेच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. पाथमु आणि कुसल या सलामी जोडीने 96 धावांची सलामी भागीदारी करत श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. श्रीलंकेने पाथुमच्या रुपात पहिली विकेट गमावली. पाथुमने श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा केल्या. पाथुमने 32 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 55 रन्स केल्या. श्रीलंकेने चांगल्या सुरुवातीनंतर अवघ्या 10 धावांच्या मोबदल्यात एकूण 4 विकेट्स गमावल्या.
पाथुमनंतर कुसल परेरा,कुसल मेंडीस आणि कॅप्टन चरिथ असलंका हे झटपट आऊट झाले. परेराने 4, मेंडीसने 38 आणि चरिथने 1 धाव केली. नुवानिदु फर्नांडो याने 7 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर दासून शनाका याने 6 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेची 6 बाद 142 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. मात्र कामिंदू मेंडीस आणि दुशन हेमंथा या जोडीने श्रीलंकेला विजयी केली. कामिंदू आणि दुशन या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 35 धावांची विजयी भागीदारी केली.
कामिंदूने 16 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारसह नाबाद 41 धावा केल्या. तर दुशन हेमंथा याने 9 बॉलमध्ये 2 फोरसह नॉट आऊट 14 रन्स केल्या.
श्रीलंकेची विजयी सलामी
We held our nerve and secured a thrilling victory! Sri Lanka wins the first T20I against Zimbabwe by 4 wickets to take a 1-0 lead in the series! #ZIMvSL #SriLankaCricket #LionsRoar pic.twitter.com/WAUCWUSuGw
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 3, 2025
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून झिंबाब्वेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. झिंबाब्वेने 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. झिंबाब्वेसाठी ओपनर ब्रायन बेनेट याने सर्वाधिक धावा केल्या. ब्रायनने 57 बॉलमध्ये 12 फोरसह 81 रन्स केल्या. ब्रायन व्यतिरिक्त कॅप्टन सिंकदर रझा याने 28 धावांचं योगदान दिलं. रायन बर्ल याने 17 आणि सीन विल्यम्सने 14 धावा केल्या. तर इतरांनाही काही विशेष योगदान देता आलं नाही. श्रीलंकेसाठी चमीरा याने सर्वाधिक 3 फलंदाजांना बाद केलं. तर एन तुषारा, महीश तीक्षण आणि दुशन हेमंथा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.