गौतम गंभीर भाजपमध्ये दाखल, गंभीरची पहिली प्रतिक्रिया काय?

नवी दिल्ली: अखेर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कमळ हाती घेतलं आहे. गंभीरने आज भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून गौतम गंभीरच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. अखेर गंभीरने भाजापमध्ये प्रवेश करुन या चर्चांना पूर्णविराम दिला. मला ही संधी दिल्याबद्दल भाजपचे धन्यवाद मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून […]

गौतम गंभीर भाजपमध्ये दाखल, गंभीरची पहिली प्रतिक्रिया काय?
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नवी दिल्ली: अखेर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कमळ हाती घेतलं आहे. गंभीरने आज भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून गौतम गंभीरच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. अखेर गंभीरने भाजापमध्ये प्रवेश करुन या चर्चांना पूर्णविराम दिला.

मला ही संधी दिल्याबद्दल भाजपचे धन्यवाद मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी पहिली प्रतिक्रिया गौतम गंभीरने दिली.

गौतम गंभीर भाजपचा स्टार प्रचारक असेल. दरम्यान लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावर नवी दिल्लीतून उभा राहण्याची शक्यता आहे. गंभीर दिल्लीमधील नवी दिल्ली या लोकसभा मतदार संघात खासदारकीसाठी मैदानात उतरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

गंभीरने काही दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर आता टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने राजकारणातील इनिंग सुरु केली आहे.

अरुण जेटली यांनी गंभीरच्या प्रवेशादरम्यान भारताने जिंकलेल्या 2007 टी 20 वर्ल्डकप आणि 2011 मधील वन डे विश्वचषकाच्या फायनल सामन्यातील खेळींचा उल्लेख केला. गंभीरने क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचा देशाला अभिमान असल्याचं जेटली म्हणाले.

15 वर्ष देशासाठी क्रिकेट खेळणाऱ्या गौतम गंभीरने 58 कसोटी सामने आणि 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. वन डे सामन्यात 11 शतक करत त्याने 5238 धावा केल्या आहेत आणि कसोटी सामन्यात 9 शतकांसह 4154 धावा केल्या आहेत.

अमित शाहांची भेट

दरम्यान, गंभीरने भाजप प्रवेश केल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.