
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्या प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत असलेल्या या जोडप्याच्या घटस्फोटाची औपचारिकता पूर्ण होण्यापूर्वीच, उच्च न्यायालयाने भारतीय वेगवान गोलंदाजाला त्याच्या पत्नीला पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. क्रिकेटपटू शमीला हसीन जहाँला मेंटेनन्स म्हणून दरमहा 4लाख रुपये द्यावे लागतील असे दोन्ही पक्षांमधील खटल्याची सुनावणी केल्यानंतर, उच्च न्यायालयाने एका आदेशात स्पष्ट केले. मात्र एवढी रक्कम मिळूनही हसीन जहाँ फारशी खुश नाही. तिने ही रक्कम खूपच कमी असल्याचे म्हटले आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज असलेला शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ हे गेल्या 7 वर्षांपासून वेगळे आहेत. हसीन जहाँने 2018 साली मध्ये शमीविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध फसवणूक आणि छळाचा आरोप केला होता. एवढंच नव्हे तर हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंग आणि इतर महिलांशी अवैध संबंध असल्याचा आरोपही केला होता. तेव्हापासून दोघेही वेगळे राहत आहेत. मात्र, या काळात त्यांची मुलगी ही हसीन जहाँसोबत राहते. या प्रकरणात हसीन जहाँने न्यायालयात अपील केले होते आणि शमीने मेंटेननस् म्हणून तिला 10 लाख रुपये द्यावेत, अशी विनंती केली होती.
महागाई वाढत्ये, 4 लाख कमी आहेत
या प्रकरणात, कोलकाता उच्च न्यायालयाने आता भारतीय क्रिकेटर, शमीला त्याच्या या पूर्व पत्नीला दरमहा 4 लाख रुपये भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. या भत्त्यातून मुलीसाठी 2.5 लाख रुपये आणि हसीन जहाँसाठी 1.5 लाख रुपये निश्चित केले आहेत. परंतु हसीन जहाँने ही रक्कम देखील कमी असल्याचे म्हटले आहे. हा आपला विजय असल्याचे शमीच्या पूर्व पत्नीने म्हटले असले तरी महागाईच्या काळात 4 लाखांची ही रक्कम कमी असल्याचे सांगितले. एका निवेदनात हसीन जहाँ म्हणाली, “गुजारा भत्ता म्हणून दिलेली रक्कम पतीच्या उत्पन्नाच्या आणि सामाजिक स्थितीच्या आधारावर ठरवली जाते… शमीच्या शानदार जीवनशैलीचा विचार केला, तर 4 लाख रुपये खूपच कमी आहेत, असे माझे मत आहे.” असं हसीन जहाँने नमूद केलं. आम्ही 7 वर्ष 4 महिन्यांपूर्वीच 10 लाखांची मागणी केली होती, ती तेव्हाची मागणी होती. मात्र आता तर महागाई देखील खूप वाढत आहे, असंही ती म्हणाली.
शमीचा वाईट काळ
मेंटेनन्सची रक्कम देण्याचा आदेश देतानाच, घटस्फोटाची प्रक्रिया लवकरात लवकर निकाली काढावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शमीसाठी, न्यायालयाचा हा निर्णय त्याच्या अलिकडच्या काळात आणखी एक धक्का आहे. तो आधीच त्याच्या कारकिर्दीच्या वाईट काळातून जात आहे. दुखापतीमुळे सुमारे सव्वा वर्ष बाहेर राहिल्यानंतर, शमी या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आणि टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यास मदत केली. परंतु खाब आयपीएल सीझन आणि तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली नाही.