
टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्याबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. टीकाकारांच्या ते रडारवर आहेत. अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात गौतम गंभीर यांनी टीम इंडियाला लिमिटेड ओव्हर्समध्ये 2 किताब जिंकून दिलेत. पण टेस्ट फॉर्मेटमध्ये म्हणावं तसं यश मिळवता आलेलं नाही. गंभीर आल्यानंतर आपल्या घरातच टीम इंडियाने मागच्या 12-13 महिन्यात 4 टेस्ट मॅच गमावल्या. काही वर्षांपूर्वी टीम इंडियाने आपल्या घरातच इतके सामने गमावणं दुर्मिळ होतं. अशी स्थिती निर्माण व्हायला वेगवेगळी कारणं आहेत. पण गंभीर यांचे प्रयोग हे सुद्धा एक कारण आहे. नंबर 3 च्या पोजिशनमध्ये सतत बदल होत आहेत. कोलकाता टेस्टमध्ये हे पहायला मिळालं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने सगळ्यांना धक्का देत नंबर 3 चा फलंदाज साई सुदर्शनला ड्रॉप केलं. सुदर्शनला त्याआधी दोन टेस्ट सीरीज इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध नंबर 3 च्या पोजिशनवर खेळवण्यात आलं. त्याच्याकडे नंबर 3 साठी टीम इंडियाच भविष्य म्हणून पाहिलं जात होतं. पण सुदर्शनच प्रदर्शन समाधानकारक नव्हतं. कोलकाता टेस्ट मध्ये गौतम गंभीर यांनी सुदर्शनला ड्रॉप करुन त्याजागी ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं.
मागच्या दीड वर्षात सात फलंदाज या स्थानावर खेळले
टेस्ट टीममध्ये नंबर 3 च्या पोजिशनमध्ये बदल होण्याची ही काही पहिली वेळ नाहीय. मागच्या दीड वर्षात भारतीय बॅटिंग ऑर्डरमध्ये वन डाऊन पोजिशनवर खेळणारा सुंदर सातवा फलंदाज आहे. गंभीर कोच बनल्यापासून आतापर्यंत 7 वेगवेगळे फलंदाज नंबर 3 च्या पोजिशनवर खेळले आहेत. गंभीर मागच्यावर्षी कोच बनले. त्यावेळी शुबमन गिल ही जबाबदारी संभाळत होता. गिल सात मॅचमध्ये वन डाऊन म्हणजे नंबर 3 वर बॅटिंगला आला.
उपाय निघण्याऐवजी अडचण वाढतेय
टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी प्लेइंग-11 आणि स्थिरता यांचं महत्वाचं योगदान असतं. टीम इंडियात मागच्या 25 वर्षात नंबर 3 वर राहुल द्रविड आणि नंबर 4 वर सचिन तेंडुलकर दीर्घकाळ खेळले. या दिग्ग्जांनंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने ही जबाबदारी संभाळली. चेतेश्वर पुजारा टीम बाहेर गेल्यापासून या स्थानासाठी योग्य फलंदाज सापडत नाहीय. शुबमन गिल या पोजिशनवर थोडा सेटल होत होता. त्याचवेळी विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली. मग, गिलला त्याची नंबर 4 ची जागा देण्यात आली. गिलने त्या स्थानावर खोऱ्याने धावा केल्या. पण नंबर 3 वरचा फलंदाज अजून निश्चित होत नाहीय. कोच गौतम गंभीर यांच्या सततच्या प्रयोगामुळे यावर उपाय निघण्याऐवजी अडचण वाढत चालली आहे.